सोलापूर : राज्यातील विविध महामार्ग व शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाकडून ’इंटरसेप्टर व्हेइकल’ खरेदी करण्यात आल्या आहेत. यात लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर अशी अत्याधुनिक यंत्रणा असलेली 5 वाहने सोलापूर व 3 वाहने अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाली आहे.

राज्यातील विविध अपघातांमागे वाहनचालकांची बेशिस्त हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. महामार्गावर वेगमर्यादा ओलांडल्यामुळे अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे अपघात घडल्याचे दिसून आले आहे. अनेक वाहनचालक मद्यप्राशन करून, वाहने चालवितात. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते. महामार्गावरील बेशिस्तीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने 187 इंटरसेप्टर व्हेइकल खरेदी केली असून राज्यतील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयांना ही वाहने देण्यात येणार आहेत.
शुक्रवारी सकाळी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहायक अधिकारी विजय तिरणकर यांच्या हस्ते इंटरसेप्टर वाहनांचे पुजन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, चालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
’इंटरसेप्टर व्हेइकल’मधील सुविधा….
महामार्ग व अन्य महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर स्पीडगनने कारवाई करण्यात येते. ’इंटरसेप्टर व्हेइकल’मध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. इंटरसेप्टर व्हेइकलच्या माध्यमातून होणार्‍या कारवाईमुळे प्रशासनाकडेे पुरावे उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन यंत्रासह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी या वाहनात ब्रेथ अ‍ॅनलायजर यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मद्याच्या नशेत वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात जागेवरच कारवाई करणे आता शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *