सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करमाळा तालुक्यातील जिंती येथील आयुर्वेदिक दवाखान्यात आयोजित आरोग्य शिबिरात आयुर्वेदीक उपचार पद्धतीनुसार 700 जणांना उपचार करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बोलताना आरोग्यासाठी काही गोष्टी आपणास परंपरेने मिळतात मात्र त्या आपण विसरून जातो. आयुष्य जगत असताना आपणास जेव्हा अडचणी अथवा आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात तेव्हाच आयुर्वेदाच्या महत्त्वाची आपणास जाणीव होते. घरांमधील मंडळीच्या छोट्या मोठ्या आजारासाठी पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला आजीबाईचा बटवा आजही आपल्याला गरजेचा वाटतो असे सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वरवटकर, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ कोमल शिर्के, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या, आयुर्वेदबाबत माझा चांगला अनुभव असून मला आयुर्वेदाचे महत्त्व पटलेले आहे. आयुर्वेदात पथ्य-पाणी खूप पाळावे लागतात. ते पाळणे गरजेचे असते. प्रत्येकाने किमान एक औषधी वनस्पती झाडाची लागवड शेतात किंवा आपल्या अंगणात करावी. जुन्या गोष्टीचे महत्त्व न विसरता त्या आत्मसात करणे, त्याचबरोबर निसर्गापासून दूर न जाता निसर्गास आत्मसात करा, निसर्ग आपणास भरभरून देणार आहे.  त्याचबरोबर आजी बाईचा बटवा हा आपला अमूल्य ठेवा आहे. ती काळाची गरज असून आपण तो जोपासला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
आयुष ग्राम जिंती हा भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचा उपक्रम आहे. गत तीन वर्षापासून जिंती व पंचक्रोशीतील नागरिकांना रुग्णांना आयुर्वेद व योग चा फायदा होत आहे.
स्तनाचा कर्करोग या आजाराचे प्रमाण महिला वर्गांमध्ये जास्त असून महिलांनी या आजाराविषयी कुठलीही शंका अथवा भीती न बाळगता निसंकोचपणे तपासण्या करून घेणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन मनीषा आव्हाळे यांनी यावेळी उपस्थित महिला वर्गांसाठी केले. यावेळी आयुषग्राम कॅलेंडरचे व योग पुस्तिकेचे अनावरण त्यांच्याहस्ते करण्यात आले .
तसेच करमाळा तालुक्यातील 50 अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्याची सेवा पुरवणेकामी नुकतीच मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या फिरते वाहनाची व पथकाची पाहणी मनीषा आव्हाळे यांनी केली .
आयु म्हणजे जीवन, वेद म्हणजे शास्त्र अशी आयुर्वेद या शब्दाची निरुक्ती आहे. उपलब्ध असलेल्या वनौषधी, आहार,व्यायाम,योग, प्राणायाम या माध्यमातून आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. निदान प्रोजेक्ट या महत्त्वकांक्षी योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडामध्ये भरीव निधीची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना केले. यावेळी अंदाजे 700 रुग्णांनी आयुष शिबिराचा लाभ घेतला. तसेच 11 तालुक्यातील 22 आरोग्यसेविका यांना प्रोजेक्ट निदान अंतर्गत स्तनाचा कर्करोग तपासणीसाठीच्या थर्मल स्कॅनिंग मशीनचे प्रशिक्षण स्त्रीरोग तज्ञ मार्फत देण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे यांनी केले. जिंती आयुष ग्रामचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *