सोलापूर : स्मशानभूमीची स्वच्छता करून मंद्रूपच्या युवकांनी होळी पौर्णिमा साजरी केली. दहनशेडमधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. युवकांच्या प्रयत्नांना ग्रामपंचायतीने पाठबळ दिल्याने, काटेरी झाडी-झुडपांनी वेढलेली बसस्थानक परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांमध्ये स्वच्छ झाली.

रविवारी सकाळी सहा वाजता स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. तरुणांनी हातामध्ये खराटा घेऊन स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरवात केली. काहींनी काटेरी झुडपं तोडायला सुरु केले. ही माहिती ग्रामपंचायतीस कळाली. शासकीय सुटी असल्याने ग्रामसेवक नागेश जोडमोटे घटनास्थळी आले. त्यांनीही मोहिमेत सहभाग घेतला. जेसीबीच्या साह्याने दहनभूमी शेडच्यामागील मोठी काटेरी झाडे मुळापासून काढण्यात आली.
रवी केवटे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत-शिवारातुन तुरीच्या काड्या गोळा करून स्वत: खराटे तयार केले. श्याम गोसावी यांनी स्मशाभूमीतील कचरा, इतर अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला. सिद्धेश्वर नंदुरे यांनी दहन शेड मधील राख गोळा करून झाडांना घातली. सचिन साठे, ओंकार झेंडेकर, शीतलकुमार माने, नितीन खराडे यांनी काटेरी झाडे झुडपात तोडून परिसर झाडून स्वच्छ केला.

गावही स्वच्छ होऊ शकते
होळी पौर्णिमेच्या  निमित्ताने स्मशानभूमी स्वच्छ करण्याची संकल्पना रानवेध फाउंडेशनने मांडली. ‘आम्ही मंद्रूपकर’ म्हणून त्यास तरुणांनी  प्रतिसाद दिला. एकजुटीतून स्मशाभूमीही स्वच्छ झाली असून संपूर्ण गावही स्वच्छ होऊ शकते, हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.’’
सिद्धेश्वर नंदुरे, मंद्रूप

एकजुटीने विधायक काम
गावातील युवकांनी एकजुटीने होळी पौर्णिमा निमीत्ताने स्मशाभूमीची स्वच्छता केली. मागील तीन वर्षापासून हे युवक गावाच्या विकासासाठी झटत आहेत. यामुळेच गावाला माझी वसुंधरेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. मागील दोन वर्षात तीन मोठे पुरस्कार गावाला मिळाले आहेत.
नागेश जोडमोटे, ग्रामसेवक, मंद्रूप

आम्ही मंद्रूपकर व रानवेध फाउंडेशनतर्फे गावामध्ये विधायक उपक्रमाची चळवळ सुरू आहे. याची प्रेरणा इतर युवकांनीही घ्यावी. हिंदू स्मशानभूमी परिसरात विद्युत दाहिनी बसविण्याबाबत शासन- प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.
शिवपुत्र जोडमोटे,
ग्रामपंचायत सदस्य

यांनी घेतला मोहिमेत सहभाग

रवी केवटे, सिद्धेश्वर नंदुरे, शाम गोसावी, सचिन साठे, मुकेश खराडे,नितीन खराडे,ओंकार झेंडेकर, शितलकुमार माने, गणेश कोरे, विनोद कामतकर, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, ग्रामसेवक निलेश जोडमोटे, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *