सोलापूर : बापरे…! सोलापूरच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. सोलापुरात उन्हाची तीव्रता आणखी वाढली असून शुक्रवारी या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ४३.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
या एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४१ ते ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती. आता पारा ४३ अंशाच्या पुढे गेला असून हा यावर्षीच्या उन्हाळ्यातील उच्चांक ठरला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. सकाळी 11 वाजेनंतर रस्ते सुनसान दिसू लागले आहेत सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवतो. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात वावटळ निर्माण होऊ लागले आहेत. यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला व मुलांना तापाची लागण होऊ लागली आहे. उष्माघात टाळण्यासाठी अकरा वाजे नंतर शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.