सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या नोटरीचा नंबर 786 आहे. त्यांना हा नंबर लकी ठरणार असे नोटरी करणारे वकील जहीर सगरी यांनी म्हटले आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत 30 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हे प्रतिज्ञापत्र त्यांनी नोटरी ऍड. जाहीर सगरी यांच्याकडे 16 एप्रिलला केलेले आहे. या नोटरीवर योगा योगाने क्रमांक 786 असा पडला आहे. मुस्लिम बांधव हा नंबर शुभ मानतात. नोटरी करून देताना हा नंबर पडल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनाही लोकसभेसाठी हा नंबर लकी ठरेल असे उद्गार ॲड सगरी यांनी काढले आहेत. राजकारणात नशिबावर खूप चर्चा होते. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. अशात असा शुभ संकेत मिळाल्याने सोलापुरात चर्चेचा विषय झाला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती सादर केली आहे. त्यांच्याकडे फक्त 31 हजार 202 रुपयाची रोकड आहे. विविध बँकांमध्ये त्यांची खाती आहेत. त्याचबरोबर विविध शेअरमध्येही गुंतवणूक आहे. त्यांच्या नावे कोणतेही वाहन नाही. त्यांच्याकडे 300 ग्रॅमचे दागिने आहेत. गुळ प्रक्रिया उद्योगात त्यांची 32 लाखाची गुंतवणूक आहे. टाकळी येथे शेती आहे तर दादरला 660 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट व सोलापूर येथे सात रस्ता येथील सोलापूर को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ‘जनवात्सल्य” नावे चार हजार 157 स्क्वेअर फुट जागेत घर आहे. त्यांच्याकडे कोणतेही कर्ज नाही. त्यांचे शिक्षण बीए एलएलबी पर्यंत झालेले आहे.