सोलापूर: आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष करणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना महागात पडणार आहे. अक्कलकोटप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी नवले व अक्कलकोट तालुका वैद्यकीय अधिकारी करजखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत.
अक्कलकोट तालुक्यात आरोग्य विभागात घडलेल्या प्रकरणाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी येथे खुर्चीवर बसलेली असताना कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचे खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. आरोग्य विभागात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. अक्कलकोट तालुक्यातील जेऊर व दुधनी येथील प्रकरणाबाबत डीएचओ नवले व टीपीओ करजखेडे यांच्याकडून खुलासाि मागितला आहे. या दोघांनाही याबाबत तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना आदेश दिले आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्रकाराबाबत आरोग्य कर्मचारी संघटनेने केलेली तक्रारही प्राप्त झाली आहे. या तक्रारीबाबतही चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. आरोग्य विभागातील गोंधळाबाबत लवकरच बैठक घेऊन आढावा घेतला जाईल व काम चुकारांना चांगला धडा शिकवला जाईल असा इशारा आव्हाळे यांनी दिला आहे. सीईओ आव्हाळे या ॲक्शन मोडवर आल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.