सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात 57.46% तर माढा लोकसभा मतदारसंघात 59.87% इतकं मतदान झालं आहे. यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते तर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर व महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात 20 लाख 30 हजार 119 मतदार आहेत. त्यातील 11 लाख 66 हजार 600 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये विधानसभानिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे. मोहोळ :  60.16 % ( मतदान:1 लाख 92 हजार 392), उत्तर सोलापूर: 56.81 % (1 लाख 76 हजार 772), सोलापूर मध्य:56.32 % (1 लाख 83 हजार 418), अक्कलकोट: 55.31% (1 लाख 98 हजार 903), दक्षिण सोलापूर : 58.21% ( 2 लाख 7 हजार 255), पंढरपूर 58.09 % ( 2 लाख 7 हजार 860 जणांनी मतदान केलं). या मतदारसंघात भाजपचे राम सातपुते व काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढत झाली आहे. आता बाजी कोण मारणार? हे चार जून रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे

माढा लोकसभा मतदारसंघात 19 लाख 91 हजार 454 पैकी 11 लाख 92 हजार 190 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची टक्केवारी 59.87 इतकी आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे आहे. करमाळा: 55% (1 लाख 74 हजार 856), माढा: 61.13%  (2 लाख 6 हजार 383), सांगोला: 59.94% (1 लाख 87 हजार 298), माळशिरस: 60.28% ( 2 लाख 3 हजार 370), फलटण: 64.23% ( 2 लाख 15 हजार 815), माण:58.42% (2 लाख 4 हजार 468). माढा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट लढत झाली आहे.  माढा व सोलापूर मध्ये कोण बाजी मारणार? याकडे राज्य त्याचबरोबर देशाचे लक्ष वेधले आहे. गावागावांमध्ये कोण जिंकणार यावर आतापासूनच पैजा लागू लागल्या आहेत. उन्हाचा कडाका असतानाही मतदारांनी रांगा लावून मतदान केले आहे. उन्हामुळे मतदान घटेल अशी भीती व्यक्त होत होती. परंतु प्रशासनाने विविध उपाययोजना केल्यामुळे मतदार मतदान केंद्राकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.

सोलापूर व माढा लोकसभेसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. सांगोला तालुक्यात ईव्हीएम जाळण्याचा तर करमाळा तालुक्यात ईव्हीएम फोडण्याचा प्रकार घडला. परंतु प्रशासनाने खबरदारी घेत लागलीच यंत्रणा राबवल्याने मतदानावर याचा कोणताच परिणाम झालेला नाही असे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *