सोलापूर: वैयक्तिक,कौटुंबिक,आर्थिक, सामाजिक, प्रशासनिक अशा विविध कारणांमुळे साक्षरतेपासून वंचित राहिलेल्या आणि त्यामुळे आपल्या नावाला निरक्षरतेचा कलंक चिकटलेल्यांपैकी महाराष्ट्रातील सुमारे सव्वाचार लाख लोकांनी ६ मे रोजी हा कलंक पुसून टाकला. आता हे सर्वजण साक्षरतेचे बिरुद आपल्या नावाबरोबर अभिमानाने मिरवणार आहेत.

निमित्त होते केंद्राच्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमातील पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या महाराष्ट्रात प्रथमच घेण्यात आलेल्या चाचणीच्या निकालाचे. केंद्र शासनाने सोमवारी ६ मे रोजी हा निकाल घोषित केला. दहावी बारावी सारख्या निकालाइतकी उत्सुकता नसली तरी मोठ्या आतुरतेने प्रौढ परीक्षार्थी निकालासाठी उत्सुक होते. महाराष्ट्रात ९२.६८ % इतके नव साक्षर उत्तीर्ण झाले आहेत. तर ७.३२% नवसाक्षरांना ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाला आहे. एरवी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आजी-आजोबा, आई-वडील व नातेवाईक आपल्या पाल्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त करतात, या निकालानंतर नेमके या उलट चित्र होते.

सन २०२२ ते २७ या पंचवार्षिक कालावधीत हे अभियान राज्यांच्या मदतीने केंद्र शासन राबवत आहे. महाराष्ट्रात सन २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ६३ लक्ष असाक्षर आहेत. मागील वर्षभरात १५ मार्च अखेर राज्यात ६ लक्ष ४१ हजार ८१६ इतक्या असाक्षरांची केंद्र शासनाच्या उल्लास ॲपवर ऑनलाईन नोंदणी झाली होती. त्यातील ४ लक्ष ५९ हजार ५३३ जणांनी १७ मार्च रोजी राज्यात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालये शिक्षण संस्थेने (एनआयओएस) हा निकाल www.nios.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन घोषित केला आहे. राज्य योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी राज्यातील निकालाची सांख्यिकी प्रसिद्धीपत्रकद्वारे दिली आहे. त्यात लिंगनिहाय, वयोगटनिहाय, जात प्रवर्गनिहाय, जिल्हानिहाय उत्तीर्ण आणि ‘सुधारणा आवश्यक’ शेरा प्राप्त परीक्षार्थी यांची सांख्यिकी दिली आहे.

योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की,या चाचणीत १ लक्ष ३९ हजार ५८२ पुरुषांनी परीक्षा दिली होती, त्यातील १ लक्ष ३०हजार २२९ म्हणजे ९३.३०% उत्तीर्ण झाले. तर ३ लक्ष १९ हजार ९४५ स्त्रियांनी परीक्षा दिली होती, त्यातील २ लक्ष ९५हजार ६७१ स्त्रिया म्हणजे ९२.४१% उत्तीर्ण झाल्या.तसेच सहा तृतीयपंथीयांनी परीक्षा दिली होती, ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात या अभियानात साक्षरतेच्या प्रचारक ठरलेल्या आणि केंद्र शासनाने दखल घेतलेल्या चिंचणी-सातारा येथील बबई मस्कर आणि पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सुशीला क्षीरसागर या दोघीही उत्तीर्ण झाल्या आहेत.

वैयक्तिक निकाल प्राप्त करण्यासाठी मार्ग
www.nios.ac.in किंवा https://results.nios.ac.in ला भेट द्यावी. आवश्यक माहिती भरून निकाल प्राप्त करता येतो व ऑनलाईन प्रिंट घेता येते.

जिल्हाचा एकत्रित निकाल प्राप्त करण्यासाठी मार्ग…
www.www.nios.ac.in किंवा https://results.nios.ac.in ला भेट देऊन हव्या असलेल्या जिल्हयाची यादी पीडीएफ स्वरुपात यादी प्राप्त होते. त्यामध्ये अनुक्रमांक, बैठक क्रमांक, नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, वय, निकालाची
तारीख, भागनिहाय गुण, एकूण गुण आणि निकाल असे रकाने आहेत.शिवाय उल्लास ॲपच्या होम पेजवरील सर्टिफिकेशन या आयकॉनवर क्लिक करुन राज्य, जिल्हा,वर्ष, महिना, निवडून स्क्रीनवरील कॅपच्या टाकून सबमिट केल्यास जिल्ह्याचा एकत्रित निकाल प्राप्त होतो.

निकाल प्राप्त करण्यासाठी अडचण येत असल्यास…
निकाल प्राप्त करुन घेण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी, साक्षर, कुटुंबिय,स्वयंसेवक अथवा शिक्षकांनी नवसाक्षरांना मदत करावी.परीक्षेवेळी केंद्र संचालकांनी १४ अंकी बैठक क्रमांक अचूकपणे परीक्षार्थ्यांना देणे आवश्यक होते. त्यातील पहिले ११ अंक हे संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या शाळेचा यु-डायस क्रमांक असून उर्वरित तीन अंक हे त्या केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या परीक्षार्थ्यास ००१, ००२, ००३, … असे दिलेले क्रमांक आहेत. बैठक क्रमांक
देतेवेळी अथवा निकालाच्या एक्सेल शीट मध्ये माहिती भरतेवेळी चूक झाली असल्यास असे बैठक क्रमांक योजना
संचालनालय स्तरावर दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे चुकलेले, दुबार झालेले बैठक क्रमांक दुरुस्त करुन निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

“राज्यातील उर्वरित असाक्षरांनी आपल्या लगतच्या शाळेकडे उल्लास ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी. तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांनी उपलब्ध असलेल्या संधींचा उपयोग करून घ्यावा.

-डॉ. महेश पालकर,
शिक्षण संचालक (योजना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *