
सोलापूर : सोलापुरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांची धावपळ उडाली.
सोलापुरात मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशात हवामान विभागाने शनिवारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लागेल असा इशारा दिला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच हवामानात बदल जाणवू लागला आहे. अचानकपणे जोरदार वारे वाहत आहेत तर झाडाची पाने हालत नाहीत अशी स्थिती झाल्यामुळे जबरदस्त उकाडा जाणवत आहे. यामुळे नागरिकांना पंखे, कुलर व वातानुकूलित यंत्राचा आधार घ्यावा लागत आहे. शनिवारी सकाळी काही तास ढगाळी हवामान त्यानंतर उन्हाचा कडाका सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजता जुळे सोलापुरात अचानकपणे पावसाचा सडाका आला. आज पाण्याचा दिवस असल्याने नागरिकांनी कपडे धुऊन वाळत घातले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी वादळ सुटेल, असा इशारा देण्यात आला आहे.