March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

काय म्हणता..! ॲडिशनल सीईओ कोहिनकर यांनी केली बदलीची मागणी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विनंती बदलीची मागणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. झेडपीच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले असून आत्तापर्यंत अधिकारी पोस्टिंग कायम राहावी म्हणून मुंबईत फिल्डिंग लावत असल्याचे चित्र दिसून आले होते.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सध्या जिल्हा परिषदेचे नवीन कामकाज ठप्प आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सोलापूर व माढा लोकसभेचे मतदान झाल्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषदेची विकास कामे, पशुसंवर्धन व जलजीवनच्या कामाला गती देण्यासाठी आचारसंहिता शिथिल होणे गरजेची असल्याची मागणी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील टप्पा पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 20 मेनंतर यावर निर्णय होईल असे सांगितले जात आहे. आचारसंहितेची ही चर्चा सुरू असतानाच अचानकपणे सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी बाब जिल्हा परिषदेत समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विनंती बदलीची मागणी केली आहे. ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांनी पाच मे रोजी विनंती बदल्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकावरून जिल्हा परिषद प्रशासनाने विनंती बदली अर्ज करण्याबाबतचे परिपत्रक जारी केल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी प्रशासनाकडे विनंती बदलीचा अर्ज सादर केला आहे. पुणे जिल्हा परिषदेला त्यांनी पसंती दिल्याचे सांगण्यात येत आहे. कोहिनकर यांच्या विनंती बदलीच्या अर्जामुळे जिल्हा परिषदेत आता दबक्या आवाजात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.

कोहिनकर यांनी एक वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला. या काळात त्यांनी समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन व बांधकाम विभागाची अनेक कामे मार्गी लावली. जिल्हा विकास यंत्रणेचा अतिरिक्त पदभार आल्यानंतर घरकुलमध्ये मागे पडलेला सोलापूरचा नंबर त्यांनी पुढे रेटला. गतवर्षीचे बजेट त्यांनी मांडले. या बजेटमध्ये त्यांनी अनेक नव्या तरतुदी सुचवल्या. पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून विकास निधी खर्च होण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिल्यामुळे त्यांचे कामकाज सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. मागीलवर्षी जलजीवनच्या कामाची बोंबाबोंब झाली होती. तत्कालीन सीईओ स्वामी प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यावर कोहिनकर यांनी जलजीवनची कामे मार्गी लावली होती. त्यामुळे कोहिनकर यांच्या पॅटर्नची जिल्हाभर चर्चा झाली होती. सर्वांशी समन्वय साधून सकारात्मकतेने काम करण्याची त्यांची हातोटी यामुळे ते जिल्ह्यात लोकप्रिय झाले आहेत. असे असताना त्यांनी विनंती अर्ज कोणत्या कारणावरून दिला याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

झेडपीचा वाजतोय डंका…

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यापासून जिल्हा परिषदेचा शिस्तीचा कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे सोलापूर झेडपीचे राज्यात नाव झाले आहे. झेडपीच्या नावाचा डंका वाजत असतानाच चांगले अधिकारी बदलीची मागणी करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत असे घडले नव्हते. सध्याची अधिकाऱ्याची टीम नव्या उमेदीने काम करीत असताना असे काय घडले की कोहिनकर यांना बदलीचा अर्ज करावा लागला, अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे. याबाबत आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विनंती बदली अर्जाबाबत नेमके कारण जाणून घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.

तर आम्ही आंदोलन करू…

जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. जिल्हा परिषदेत आम्ही प्रतिनिधित्व करीत असताना काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘चले जाव “चा इशारा दिला होता. कोहिनकर यांचे काम खूप चांगले आहे. त्यांनी बदलीसाठी अर्ज केला आहे, हे ऐकून आम्हालाही धक्का बसला आहे. अवेळी त्यांची बदली झाली तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.

अरुण तोडकर, माजी सदस्य