सोलापूर : 18 तासात 25 किलोमीटर महामार्ग बांधण्याचा रेकॉर्ड करणारा सोलापूर विजयपूर महामार्ग हत्तुर ते 13 मैल दरम्यान खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
सोलापूर – विजयपूर असा एकशे दहा किलोमीटरचा महामार्ग आहे. हा महामार्ग कर्नाटकात चित्रदुर्गमार्गे बंगळुरू तर महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, धुळे येथून इंदोर, ग्वाल्हेरशी जोडला गेला आहे.ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या बांधकामाने रेकॉर्ड केल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. धुळखेड, होर्तीतांडा ते तिडगुंदी दरम्यान 18 तासात 25.5km सिंगल लेन रस्ता तयार करण्याचा विक्रम करण्यात आला आहे. या विक्रमाची देशभरात चर्चा झाली होती. हा महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सोलापूर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. हत्तुर ते केगाव बायपासमार्गे मंगळवेढा व पुणे महामार्गाची वाहतूक जोडली गेल्यामुळे हैदराबादकडून येणारी जड वाहने या मार्गाकडून वळविली गेले आहेत. याचबरोबर मंद्रूप – कामती मार्गावरील वाहतुकीचा ताण बऱ्याचअंशी कमी झाला आहे.
असे असताना या महामार्गाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. हत्तुर ते तेरामैल दरम्यान हा महामार्ग बऱ्याच ठिकाणी खचला आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना धोका निर्माण झाला आहे. रस्ता खचल्यामुळे लेनमधून वाहने बाजूला सरकत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. यामुळे रात्री अपघात घडत आहेत. होनमुर्गी फाट्याजवळ एका ट्रकने लोखंडी डिव्हायडरला ठोकले होते. नुकतेच हे लोखंडी रॅक बसविण्यात आले आहेत. पण आता पावसाळा तोंडावर आलेला असतानाही खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. यादरम्यान गतवर्षीही हाच रस्ता खचला होता. वारंवार ही स्थिती निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
हे माहित आहे का?
ज्या महामार्गावर टोल आहे त्या महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती निघाल्यास जितका रस्ता दुरुस्तीचा आहे तितकी रक्कम टोल मधून कपात करणे आवश्यक आहे. महामार्गाचा ठेका घेणाऱ्या कंपनीबरोबर हा करार केलेला असतो अशी एका महामार्ग विभागात काम केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली. पण आत्तापर्यंत रस्त्याची दुरुस्ती सुरू असतानाही टोलमध्ये कपात झाल्याचे कोठेच उदाहरण आढळून आलेले नाही.