सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभागाने जिल्हा प्रशिक्षण सेंटर व लसीकरण सेंटरच्या इमारतीसाठी पाठविलेला प्रस्ताव शासनाकडून मंजूर होणार आहे. राज्यातील तीन सेंटरमध्ये सोलापूरचेही नाव आल्याने आरोग्य विभागाचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

मिनी मंत्रालयामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची 77 आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यान्वित आहेत. आरोग्य विभागाचे वॅक्सिन सेंटर (लसीकरण विभाग) सिविल हॉस्पिटलच्या आवारातील औषध भंडारामध्ये कार्यरत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना औषधे व लसीचा साठा या केंद्रातून उपलब्ध केला जातो. करमाळा सांगोला, माळशिरस या तालुक्यासाठी औषधे व लसी आणण्यासाठी हे अंतर लांब होते.  त्याचबरोबर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वारंवार प्रशिक्षण दिले जाते. नव्याने आलेल्या लसी व शासनाकडून येणारे कार्यक्रम याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या आवारात असलेली इमारत प्रशिक्षण केंद्रासाठी वापरली जाते.  या प्रशिक्षण केंद्रात जिल्हा परिषदेचा आरोग्य, टीबी, कुष्ठरोग विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. पण या ठिकाणी तोकड्या सोयी आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागाने ट्रेनिंग व लसीकरण सेंटरसाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला आरोग्य विभागाने नुकतीच मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील तीन प्रस्तावापैकी सोलापूरचा प्रस्तावही मंजूर झाल्यामुळे आरोग्य विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोंडीला होणार ट्रेनिंग सेंटर

जिल्हा परिषदेच्या कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच्या परिसरात मोठी जागा आहे. या ठिकाणी ट्रेनिंग व वॅक्सिन सेंटरची इमारत उभा करण्याचा आरोग्य विभागाने प्रस्ताव दिला होता. ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी सभागृह व साऊंड सिस्टिम त्याचबरोबर महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वस्तीग्रह व आणि मेसची सुविधा राहणार आहे. तर लसीचा साठा ठेवण्यासाठी स्वतंत्र वातानुकूलीत इमारत उभी करण्यात येणार आहे. कोंडी हे सेंटर सर्वांच्या सोयीचे होणार असल्याने ही जागा निवडण्यात आली आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडे ट्रेनिंग सेंटर नसल्याने सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे आठ कोटीचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे तोंडी सांगण्यात आले आहे. शासनाचे परिपत्रक आल्यावर यावर शिक्कामोर्तब होईल, अशी आशा आहे.

डॉ. संतोष नवले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *