June 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

वडापूरच्या माजी सरपंचविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सोलापूर: दक्षिण सोलापूरातील वडापूरचे माजी सरपंच राजश्री कोळी यांनी अनुसूचित जाती जमातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे पत्र दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सदर बझार पोलिसांना दिले आहे.

राजश्री औदुंबर कोळी यांनी सन 2020 – 21 मध्ये ग्रामपंचायत वडापूर येथील सार्वत्रिक निवडणूक अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र सादर करून लढवली होती.या अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणपत्राबाबत बिपिन पाटील यांनी अनुसूचित जातीचा जमाती प्रमाणपत्र समितीकडे  तक्रार केली होती. पाटील यांनी तक्रारी सोबत मूळ माहेरीकडील गाव होटगी स्टेशन असताना कोळी यांनी पंढरपूर तहसिलदार यांच्या कार्यालयातील बनावट जात प्रमाणपत्र बनवून घेऊन त्या आधारे वडापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस दक्षता पथकाची संलग्न असलेल्या संशोधन अधिकारी यांनी अर्जदार कोळी या महादेव कोळी या अनुसूचित जमातीचे नसताना देखील कोळी महादेव जमातीचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जाती जमातीचा लाभ घेण्याचा प्रयत्न  केला आहे, हे चौकशीत सिध्द झाले आहे.

या तक्रारीबाबत समितीसमोर प्राप्त कागदपत्रे, पोलीस दक्षता पथकाचा अहवाल, पंढरपूर तहसील कार्यालय यांचा लेखी अभिप्राय इत्यादी सर्व बाबींचा बारकाईने गांभीर्याने विचार करून अनुसूचित जाती समितीने एकमताने राजश्री कोळी  या कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही,   त्यामुळे कोळी यांचे महादेव अनुसूचित जमातीचा प्रमाणपत्र अवैद्य ठरवले आहे. त्यामुळे राजश्री कोळी यांच्या विरुद्ध  फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

नायब तहसीलदार देणार फिर्याद   

नायब तहसीलदार आर.बी.भंडारे यांना याबाबत सदर बजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल दक्षिण तहसील कार्यालयात सादर करण्याचा करण्याचे आदेश  दक्षिण तहसीलदार जमदाडे यांनी दिले आहेत.

 

जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यपद रद्द केले होते. मात्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नव्हता त्यामुळे नैसर्गिक तत्त्वानुसार न्याय देण्याची मागणी केली असता न्याय मिळाला आहे.

बिपिन पाटील,

तक्रारदार