सोलापूर : जिल्हा परिषदेत परिचार या पदावर 39 वर्षे सहा महिने सेवा करून निवृत्त होणारे अरुण क्षीरसागर यांनी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून सतरा वर्ष काम पाहिले आहे. त्यांच्या या सेवेप्रित्यर्थ एक जून रोजी फडकुले सभागृहात जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सत्कार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गिरणी कामगार कुटुंबात जन्मलेले अरुण क्षीरसागर यांना जिल्हा परिषदेत आठ डिसेंबर 1984 रोजी सेवेची संधी मिळाली पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील आयुर्वेदिक दवाखान्यात त्यांना परिचर म्हणून पहिल्यांदा नियुक्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्थ विभाग आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभागात सेवा केली. जिल्हा परिषदेत सेवा करीतच असताना सतरा वर्षांपूर्वी त्यांना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. बाबा कारंडे व रमाकांत साळुंखे यांच्या चळवळीचे नेतृत्व गुण घेऊन त्यांनी 2007 साली कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना स्थापन केली. संघटनेच्या वाढीसाठी त्यांनी तालुके दौरे केले. या काळात अपघात झाला तरी त्यांनी तमा बाळगली नाही. कर्मचाऱ्यांना न्याय हक्कासाठी जागृत करण्यासाठी राज्यातील कामगार नेत्यांना बोलावून मेळावा घेतले. कामगाराच्या प्रश्नासाठी आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाला कृषी अधिकारी, सहाय्यक अधिकारी, बिगारी, ग्रामसेवक अशा सर्व केडरमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची साथ दिली. सर्व संघटनांना एकाच छत्राखाली आणून आपल्या न्याय हक्कासाठी झगडण्याचे मोलाचे काम त्यांनी या काळात केले. संघटन गुण अंगातच असल्याने व शांत व संयमी स्वभावाचा त्यांना चांगलाच फायदा झाला. जिल्हा परिषद संघटनेच्या कामकाजासाठी स्वतंत्र असे कार्यालय उभे केले. मागासवर्गीय म्हणून अन्याय झाला अशी तक्रार आल्यावर खातरजमा केल्याशिवाय त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही, हे येथे उल्लेखनीय.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा असा लढवय्या नेता अरुण क्षीरसागर 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत सेवापूर्ती गुणगौरव करण्यासाठी गौरव समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत होळकर हे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एक जून रोजी फडकुले सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता सत्कार समारंभ होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन्मानित नामदेवराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, भारत शेंडगे, प्रभु जाधव ,म्हाडाचे वित्तीय नियंत्रक अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, इशादीन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.