सोलापूर : अरे.. मी तुम्हाला काय भानगडखोर वाटलो की काय? आता माझी मला केबिन द्या, मी दररोज कुठे बसू? अशी कैफियत जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी मांडली आहे. काकांच्या हट्टापुढे झेडपी अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना कुलूप घातले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कधी तर झेडपीत यायचे. उपाध्यक्षांच्या केबिनमध्ये अर्थ विभागाचे कार्यालय थाटण्यात आले आहे. माजी पक्षनेते अण्णाराव बाराचारे व विरोधी पक्षनेते काका साठे हे दोघेच केबिनचा वापर करीत होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात या केबिन बंद करण्यात आल्या. आता लोकसभेची निवडणूक संपली आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता आचारसंहितेचा काय संबंध? असे म्हणत सोमवारी काका साठे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन केबिन खुली करण्याची मागणी केली. लवकरच केबिनचा ताबा देऊ, असे आश्वासन आव्हाळे यांनी दिल्याचे साठे यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी पुन्हा काका झेडपीत आले व त्यांनी आपली केबिन ताब्यात देण्याची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे मागणी केली. पण आज मुख्य कार्यकारी अधिकारी परगावी असल्याचे सांगण्यात आल्यावर काका आल्या पावली परतले. मी काय भानगड करतो काय? आता आचारसंहितेचा कुठे संबंध? असे म्हणत काकांनी केबिन मिळाली पाहिजे असा हट्ट धरला आहे. काका गेल्या 40 वर्षापासून जिल्हा परिषदेतील कार्यालयातूनच आपला संपर्क ठेवतात त्यामुळे सोलापुरात आल्यावर ते थेट झेडपीतच येतात. पक्षाच्या कार्यालयात त्यांनी कधी आपला वेळ खर्च घातलेला नाही. लोकांच्या संपर्कासाठी झेडपीच त्यांना सोयीचे वाटते पण सध्या त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने अडचण निर्माण होत आहे. पण आचारसंहिता शिथिल न झाल्याने अधिकाऱ्यांचा नाईलाज झाला आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथिल झाल्याचे अद्याप निवडणूक आयोगाकडून पत्र आलेले नाही. केबिनच्या चाव्या प्रशासन विभागाकडे आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ.
संतोष कुलकर्णी,
कार्यकारी अभियंता, झेडपी मुख्यालय