March 7, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

रमेश कदम यांच्यासह 72 जणांना शिक्षा व दंड

सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह 72 कार्यकर्त्यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सोमवारी ठोठावण्यात आली. 2015 साली मोहोळ येथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडणे, पोलीस स्थानकावर मोर्चा काढल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा करण्यात आली. तसेच त्यांना एक हजार रुपयांचा दंडही करण्यात आला.
जमावबंदीचा आदेश झुगारून मोहोळ येथे सोलापूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह ७४ जणांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता.  ४ जुलै २०१५ रोजी मोहोळ येथील चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन व नंतर मोहोळ पोलीस ठाण्यातही राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्यासह इतरांनी अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेश झुगारून आंदोलन केले. पोलिसांवर हल्लाही केला होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या जाळीचे नुकसान करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या फिर्यादीनुसार सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. जेसीबीद्वारे रमेश कदम यांनी याविरोधात मोर्चा काढला होता. त्यांनी पुलाखालील मोकळ्या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून लावलेली जाळी तोडली होती. या खटल्याच्या सरकारतर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादीसह पोलीस तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी याचे अंगरक्षक असलेले पोलीस शिपाई यांची साक्ष तसेच आंदोलनाच्यावेळी काढण्यात आलेले व्हिडीओ व छायाचित्रिकरण महत्वाचे ठरले. सरकार पक्षाचे चार महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील कविता बागल तर आरोपींच्यावतीने ॲड. मिलींद थोबडे, ॲड. राज पाटील व ॲड. सराटे यांनी काम पाहिले.