सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराचे प्रचार प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मार्डी गावात काँग्रेसच्या उमेदवाराला पाचशेच्या वर लीड मिळाला आहे तर मोहोळ विधानसभा मतदारसंघात 21 गावात मीच ‘डॉन” असल्याचा दावा शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका उर्फ बळीराम साठे यांनी केला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा लीड मिळाला आहे. या मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावे येतात. या 24 गावातून काँग्रेसच्या उमेदवाराला लीड दिला आहे, असा दावा शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी केला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मी जो शब्द दिला होता तो खरा करून दाखवला आहे. या मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचारासाठी भाजपच्या उमेदवाराला मदत केली. तरीही या मतदारसंघात फरक पडलेला नाही. अनगरमध्ये मात्र माजी आमदार राजन पाटील यांचा प्रभाव दिसून आला पण इतर 52 गावात काँग्रेसलाच चांगले मतदान झाले आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या नरखेड गावात काँग्रेसला चांगले मतदान झाले आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे प्रचार प्रमुख व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे मार्डी हे गाव आहे. या गावात काँग्रेसच्या उमेदवाराला पाचशेच्यावर लीड असल्याचे साठे यांनी सांगितले. जिल्हास्तरावर नेतृत्व करणाऱ्यांनी आपल्या गावाकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून आले आहे. शेटफळ परिसरात झेडपीचे माजी बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचा प्रभाव दिसून आला आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना खासदार करण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाने सर्वात मोठा लीड दिला आहे.