सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च  रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आणि संपूर्ण देशभरात लोकशाहीच्या उत्सवात सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच दिनांक 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. दोन्हीही मतदार संघात मतदानाच्या टक्केवारीत झाली तर 4 जून रोजी संपूर्ण देशभरासह सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्न होऊन जिल्ह्यातील मतदारांनी लोकशाहीचा उत्सव अत्यंत थाटात साजरा केला. यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सूक्ष्म नियोजन करून शांततामय व भयमुक्त वातावरणात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली. याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले होते. अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोका लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी- कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे ततोतंत पालन करून लोकशाहीचा उत्सव यशस्वीपणें साजरा होण्यास साठी सक्रिय सहभाग नोंदविला.
हा लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव साजरा करताना मतमोजणीसाठी असणारे कर्मचारी,अधिकारी ,उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवार, पत्रकार आदींना निवडणूक पार पडताना आतापर्यंत देण्यात आलेल्या नव्हत्या एवढ्या चांगल्या सेवा सुविधा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. विशेष म्हणजे या सुविधेमुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा, सोलापूर लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया सहज, सुलभ आणि सुकरपणे पार पडली. सोलापूर व माढा या दोन मतदारसंघासाठी सोलापुरातील रामवाडी गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. या गोदाम परिसराला एका खूप मोठ्या राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले होते.

वाहन पार्किंग व्यवस्था
मतमोजणी परिसरात वाहनांची गर्दी टाळण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधीसाठी केंद्रीय विद्यालय येथे वाहनतळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

वातानुकुलीत कक्षामध्ये मतमोजणी
मतदान यंत्र आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, अडथळे आणि समस्या येऊन याकरिता सर्व मतमोजणी कक्ष वातानुकूलित करण्यात आले होते. या कक्षामध्ये मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती. कक्षांमधील उपस्थितांसाठी पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मंडप, आधुनिक सुविधांची व्यवस्था
जिल्ह्यात होणाऱ्या मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाची शक्यतेबाबत दूरदृष्टी ठेवून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण गोदामाच्या परिसरात वॉटरप्रूफ शामियाना उभा करून घेतला होता. ऐन मतमोजणी प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस सुरू झाल्यावरही कुठल्याही प्रकारची तारांबळ उडाली नाही. गोदामाच्या आतील परिसरात चिखल झाला नाही. ईव्हीएम मशीन असलेल्या पेट्या घेऊन जाताना कर्मचाऱ्यांना पावसाचा कोणताही अडथळा आला नाही. त्यामुळे मतमोजणीस ही पावसाचा आडथळा आला नाही उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील सायंकाळी आल्यावर भर पावसात त्यांना निवारा मिळाला. मतमोजणी कक्ष व परिसरात अनुचित प्रकार घडू नये साठी खबरदारी म्हणून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले होते. कंट्रोल रूममधून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात येत होते.

स्वच्छतेची विशेष सोय 
महिला व पुरुषासांठी तात्पुरते स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दोन फिरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. गोदामाचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आलेला होता. स्वच्छतेसाठी सोलापूर महापालिकेचे सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते.

प्राथमिक आरोग्य आणि भोजनाची सुविधा
मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उद्भवली तर त्यावेळेस त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच ॲम्बुलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती. परिसरात चहा, अल्पोहार आणि भोजन व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही प्रकारचा तणाव हा कर्मचारी अधिकारी आणि निवडणूक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना देखील एअर कुलर च्या माध्यमातून त्यांच्या कर्तव्यावर असताना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोलापूर मनपाच्या स्वच्छता विभागाकडून सातत्याने परिसराची स्वच्छता करण्यात येत होते.

पोलीस सुरक्षा व्यवस्था
मतमोजणी ही शांततेत व सुरळीत पार पडावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतमोजणी कक्षात, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप सुविधा देण्यात आली होती. मतमोजणी कक्ष आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडले.
मतमोजणी केंद्रावर राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती :
मतमोजणी कामाकरिता राखीव अधिकारी आणि कर्मचार्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्ट्रांग रूममधून मतमोजणी कक्षामध्ये मतदान यंत्र पोहोचविण्यासाठी कलर कोडींग केलेले कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मतदान यंत्र नेण्यात येत होते.

मिडिया सेंटर 
अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत पत्रकारांसाठी देखील पत्रकार कक्ष उभा करण्यात आला होता. या कक्षामध्ये चहा, शुद्ध पाणी आणि भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आली होती. वातानुकूलित संपूर्ण कक्ष तयार करण्यात आला होता. या पत्रकार कक्षामध्ये दूरचित्रवाणी, इंटरनेट सुविधा, झेरॉक्स, संगणक, प्रिंटर अशा सर्व सुविधा पत्रकारांना पुरवण्यात आल्या. तसेच माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघातील फेरीनिहाय येणारी आकडेवारी व्हाट्सअप ग्रुपवर पाठविण्याबरोबरच त्याची फेरीनिहाय प्रत्येक प्रत पत्रकारांना देण्यात येत होती.त्यामुळे पत्रकारांना अचूक आणि वेळेवर वार्तांकन करण्यासाठी मदत झाली. यासाठी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.

अशा उत्कृष्ट सुविधामुळे संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया उत्तमरित्या संपन्न झाली. याबाबत पत्रकारांनी कर्मचाऱ्यांनी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधी देखील समाधान व्यक्त केले. सेवा सुविधा अधिक पुरवल्या की प्रत्येकाला काम करण्याची ऊर्जा मिळते. या हेतूने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून या उत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. आणि योग्य त्या सोयी सुविधा दिल्या जात आहेत का नाहीत याची स्वत:हून तपासणी केली. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *