सोलापूर: अरे… अजून आपण लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडलोच नाही. निवडणूक निकालामध्ये आपण गुंग असतानाच वरूण राजाने आपल्यावर इतकी मोठी कृपा केली तरी त्याची चर्चाच नाही.  सोलापूर जिल्हा दुष्काळातून बाहेर आला आहे असा दमदार पाऊस सर्वदूर झाला आहे. कित्येक वर्षानंतर जूनमध्ये पावसाने अशी दमदार एन्ट्री लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. अजूनही पावसाळी वातावरण आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. गतवर्षी खरीप हंगामात पाऊस पडलाच नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा लागला होता. खरे तर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व मोहोळच्या काही भागात अशी वाईट स्थिती असतानाही येथील शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय मिळाला नव्हता. त्यामुळे या तालुक्याला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईने ग्रासले होते. उजनी मायनसवर गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. प्रशासनाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी धावपळ सुरू होती. पण अखेर वरूण राजालाच शेतकऱ्याची दया आली आहे.  सोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. अशात दमदार पावसाची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या कित्येक वर्षातून यंदा पहिल्यांदाच जूनमध्ये असा पाऊस पडला आहे. त्यामुळे आता वाफासा आल्यावर सोयाबीन, मूग, उडीद, मका,बाजरी या पिकांच्या पेरणीला जोरदार सुरुवात होणार आहे.  या पावसाने चाऱ्याचा प्रश्नही दूर केला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे ही दमदार हजेरी आहे. शेतात व बांधाच्या ठिकाणी पहिल्यांदाच पाणी साचले आहे. अद्याप बोर, विहिरी यांच्या पाणी पातळीत फरक पडणार नसला तरी हा पाऊस शेतकऱ्यांना खूप उपयुक्त ठरला आहे.

असा दिसेल परिणाम…

पावसाने उघडीप दिल्यावर पेरणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडेल.  बियाणे व खताची टंचाई यंदा मोठ्या प्रमाणावर जाणवेल अशी स्थिती आहे.  उसाचे क्षेत्र कमी झाले असले तरी आता शेतकरी इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर तयारीत आहे. येत्या वटपौर्णिमेला कर्नाटकी सीमाक्षेत्रात ‘कारहुनवी” हा शेतकऱ्यांचा सण साजरा होणार आहे. या सणासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर आषाढी यात्रेची तयारी सुरू आहे. राज्यभर पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे यंदा आषाढी वारीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे प्रशासन आतापासूनच तयारीला लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *