सोलापूर: कोरोना महामारीच्या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या सुमारे पंधरा कोटीच्या बिलांची पूर्तता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात जिल्हा परिषदेचे अनेक आरोग्य कर्मचारी व अधिकारी निवृत्त झाले आहेत. महामारीच्या काळात पेन्शन, पेन्शन विक्री व भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हे कर्मचारी आरोग्य कार्यालयास हेलपाटे घालत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी या फायलींचा निपटारा करण्यास सुरुवात केली. सर्व फायलींचा निपटारा केल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदरात सुमारे 15 कोटीची रक्कम पडली आहे. यामुळे निवृत्तीनंतर विविध आर्थिक समस्येत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्व विभागाच्या वैद्यकीय बिलांचीही अनेक प्रकरणे निकालीत काढण्यात आली आहेत. राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांची यादीही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे वीस वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी सेवा देणारे कर्मचारी आता झेडपीचे कर्मचारी होणार आहेत.
कोरोना महामारीच्या काळात निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांची प्रकरणे रखडली होती. ती सर्व प्रकरणे आता मार्गी लावली आहेत. यातून कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सुमारे पंधरा कोटीच्या बिलाचे वितरण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यात समाधान आहे.
डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी