सोलापूर : सर्वसामान्य माणूस आजारी पडला तर डॉक्टर इलाज करतात पण एखादा डॉक्टर आजारी पडला तर कोण इलाज करणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू शकतो. पण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर कोण उपचार करणार? असा प्रश्न पडला आहे.
मागील महिन्यात करमाळा तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील भांडण चव्हाट्यावर आले होते. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष समीर शेख यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर याबाबत ‘सोलापूर समाचार” ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांच्या सूचनेनुसार करमाळा गटविकास अधिकारी राऊत यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. पण नंतर संबंधित डॉक्टराने हात वर केले. पुन्हा संबंधित कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली. आरोग्य सेविका आर. वाय. सय्यद यांची रजा मंजूर करून पुन्हा विनावेतन केले. कंत्राटी आरोग्य सेविका गायकवाड यांच्या सर्विस बुकावर नॉट फेअर असा शेरा मारून पुन्हा सेवेत न घेण्याची शिफारस केली . आरोग्य सहाय्यक प्रकाश सरडे यांच्या कपाटाला सील ठोकले व नंतर परस्पर सील फाडले. त्यामुळे सरडे यांनी रेकॉर्ड गहाळ झाल्यास मी जबाबदार नाही असा वरिष्ठांना अर्ज दिला आहे. आता या डॉक्टरांचे प्रताप आवरण्यासाठी ‘टोपी” घालणार कोण? असा प्रश्न तेथील कर्मचाऱ्यांना पडला आहे. याबाबत आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा समेट घडविण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही या डॉक्टराने दाद दिली नाही. त्यामुळे विक्षिप्तपणे वागणाऱ्या या डॉक्टरचा इलाज करणार कोण? असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे या डॉक्टराला कारवाईचा ‘डोस” देणार का? असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
डॉक्टराचे प्रताप छायाचित्रातून…