सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या गुरुवारी झेडपीत येणार आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे त्यांनी दौरे सुरू केले आहेत. सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाला त्यांनी विकास कामाचा आढावा घेण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार गुरुवार दिनांक 20 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्या सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देणार आहेत. या भेटीच्या अनुषंगाने होणाऱ्या विकास कामाच्या बैठकीबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अधिकाऱ्यांना कामाची माहिती घेऊन बैठकीला हजर राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या शिफारशींवर जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू आहे. मागील भाजपचे खासदार विकास कामाच्या पाठपुराव्यासाठी जिल्हा परिषदेत कधीही आले नव्हते. पण पहिल्यांदाच खासदार प्रणिती शिंदे यांनी विकास कामाची माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. आपल्या कार्याची ओळख दाखवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आत्तापर्यंत ‘राज्य” करणाऱ्या राजकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घातले जाणार आहे. या बैठकीचा चांगला परिणाम भविष्यात दिसेल असा आशावाद काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.