सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार आता तिसऱ्यांदा बदलण्यात येत आहे. पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्यावर आता समाज कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांच्यावर लातूर व सोलापूर येथील कामकाजाचा ठपका ठेवून यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खमितकर निलंबित झाल्यानंतर त्यांचा पदभार महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे देण्यात आला होता. यापूर्वी मिरकले यांनी प्राथमिक शिक्षण विभागाचाही अतिरिक्त पदभार सांभाळला होता. मिरकले यांच्याकडे महिला व बालकल्याण विभागाची असलेली मोठी जबाबदारी पाहून त्यांनी समाज कल्याणचा कारभार दुसऱ्यांकडे द्यावा अशी मागणी सीईओ आव्हाळे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर सीईओ आव्हाळे यांनी समाजकल्याणचा अतिरिक्त पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे दिला होता. समाजकल्याणचा पदभार घेतल्यानंतर पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या भरतीची परीक्षा घेण्याची मोठी जबाबदारी आली. त्यामुळे या कामकाजाकडे दुर्लक्ष होऊ लागले. समाजकल्याण विभागाच्या कामाचा व्याप पाहून त्यांनीही ही जबाबदारी दुसऱ्यांकडे द्यावी अशी मागणी केली. त्यावरून सीईओ आव्हाळे यांनी समाजकल्याणचा अतिरिक्त पदभार पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. जाधव यांनी जिल्ह्यातील स्वच्छता विभाग व ग्रामीण पुरवठा विभागाअंतर्गत सुरू असलेल्या जलजीवनच्या कामांचा उरक वेगाने करण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. कामाला वेळ देण्याची क्षमता व अचूकपणे काम करून घ्यायची गुणवत्ता असल्याने सीईओ आव्हाळे यांनी जाधव यांच्यावर समाजकल्याणची अतिरिक्त जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जाधव यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव सुरू झाला आहे.