सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्यातील संशयित आरोपी सोलापूर झेडपी शाळेतील शिक्षक संजय जाधव यांनी नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदलीमध्ये आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचे दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याचे उघड झाले आहे. जाधव यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लातूरमधील नीट घोटाळ्यात सोलापूरचे नाव गाजत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचे दिसून आल्यावर ‘त्या” शिक्षकाचे अनेक कारनामे उघड होत आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी सोमवारी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना सविस्तर निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नीट घोटाळ्यातील संशय आरोपी झेडपी शाळेचा शिक्षक संजय जाधव यांच्या कारनाम्याची माहिती दिली आहे. जाधव हा मूळचा चाकूर येथील ढोकीतांडा येथील रहिवाशी असून रत्नागिरी जिल्ह्यात त्याने आतापर्यंत सेवा केली आहे. एक वर्षांपूर्वी तो सोलापूर जिल्हा परिषदेकडे बदलून आला. तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांच्या काळात त्याला मोहोळ तालुक्यातील झेडपीची शाळा देण्यात आली होती. त्यानंतर माढा तालुक्यातील कळसाईत या सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकळीवस्ती शाळा येथे शिक्षक नसल्याची तक्रार केली होती.त्यानंतर जाधव याला येथील शाळेवर नियुक्ती मिळाली. या काळात त्याने स्वतः ज्ञानार्जन करण्याऐवजी दहा हजार रुपये मानधन देऊन पोट शिक्षक नियुक्त केला. लातूर येथे तो क्लासेस घेतो व त्याची पाच मजली इमारत असल्याची माहिती जगताप यांनी काढली आहे. या क्लासेसच्या माध्यमातून त्याने जाळे निर्माण केल्याचा संशय आहे. टाकळी येथील शाळेवर तो कधी गेलाच नाही अशी तेथील पालकांची तक्रार आहे. त्यानंतर नुकताच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये शिक्षक जाधव यांनी आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचे कारण दाखवून लातूरला ये जा करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यात बदली मिळवली आहे. जाधव याच्यासारखेच पोट भाडेकरू शिक्षक ठेवून अनेक शिक्षक असले उपदिव्याप करीत असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अशा शिक्षकांची चौकशी करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे.