सोलापूर : नीट परीक्षा घोटाळासंबंधी निघालेल्या लातूर कनेक्शनमधील संशयित आरोपी झेडपी शाळेच्या ‘त्या” शिक्षकासंबंधी अहवाल मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
सीबीआय पोलिसांनी नीट परीक्षा घोटाळा उघड केला आहे. नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरचे कनेक्शन उघड झाले असून तीन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे असलेल्या एका शिक्षकाचे नाव आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित शिक्षकाची माहिती घेण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी सांगितले. माढा तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषदेच्या शाळेवर हा संशयित शिक्षक कामाला आहे. संजय जाधव असे त्या संशयित शिक्षकाचे नाव असून गेले कित्येक दिवस तो शाळेवर हजर नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून माहिती घेण्यात येत आहे. याबाबत अद्याप पोलिसांनी शिक्षण विभागाशी संपर्क केल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण शिक्षण विभागाने अलर्ट होऊन स्वतःहून त्या संशयित शिक्षकाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
नीट घोटाळ्या संबंधी झेडपी शाळेच्या शिक्षकाचे नाव आल्यावर माढा गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केला आहे संशयित शिक्षक संजय जाधव यांच्याबाबत ते लवकरच सविस्तर अहवाल सादर करतील. पोलिसांनी अद्याप आम्हाला याबाबत विचारणा केलेली नाही.
कादर शेख,
प्राथमिक शिक्षणाधिकारी