सोलापूर : जिल्हा परिषद मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळातील विनंती बदलीला पात्र असलेल्या 2700 शिक्षकांपैकी फक्त 694 शिक्षकांनी विनंती बदली मान्य केली आहे. 2 हजार शिक्षकांनी बदलीला नकार व गैरहजेरी दाखवली आहे.
बदली म्हटले की जिल्हा परिषदेचे शिक्षक जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसत असतात. शिक्षकांच्या बदल्या शासनस्तरावरून ऑनलाइन प्रक्रियेने असल्याने अनेकांना मनासारखी पोस्टिंग मिळत नाही. त्यामुळे झेडपी शाळेतील शिक्षकांची नेहमी कुरकुर सुरू असते. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने यंदा जिल्हा परिषद स्तरावर ज्येष्ठ शिक्षकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी रिक्त जागेवर नियुक्ती देण्यासाठी विनंती ऑफलाईन बदल्या करण्यास परवानगी दिली. यासाठी जिल्ह्यातील सुमारे 2700 शिक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. इतकी मोठी प्रक्रिया राबवताना गोंधळ होईल, त्यामुळे या बदल्या कशा करायच्या? या चिंतेत शिक्षण विभाग होता. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शिक्षकांना न्याय देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विनंती ऑफलाईन बदल्या कराव्यात अशी सूचना केली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग पंधरा दिवस या प्रक्रियात होता. नेहरू वस्तीगृहात विनंती बदल्यासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना थेट बोलावून त्यांच्या पसंती क्रमानुसार नियुक्त्या देण्यात आल्या. याचा 694 शिक्षकांनी फायदा घेतला. प्रक्रियेत कोणताही गोंधळ किंवा अन्याय झाल्याबाबत तक्रार आलेली नाही. उर्वरित 2000 शिक्षकांनी आपल्या पसंतीची जागा उपलब्ध नसल्याने आहे त्याच जागेवर समाधान मानून नकार व प्रक्रियेला गैरहजेरी दाखवल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.
82 जणांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती
82 शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देऊन नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे 82 शाळांना नव्याने मुख्याध्यापक देण्यात आले आहेत. तरीही बऱ्याच शाळांवरील मुख्याध्यापक रिक्त आहेत. नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकांपैकी काहीजण लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शाळांना मुख्याध्यापक देण्याची आणखी गरज भासणार आहे. आता इतर जिल्ह्यातून बदलून आलेल्या शिक्षकांना संधी मिळणार आहे.
गणवेश, आहाराविना शाळा
जिल्हा परिषद शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष गणवेश व पोषण आहाराविना सुरू झाले आहे. जिल्हा परिषद शाळांना तांदूळ मिळालेच नाही. त्यामुळे खिचडी शिजलीच नाही. शासन स्तरावरूनच गणवेशाकरिता कापड व आहार वाटपात गोंधळ आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी आहार वाटपाला अद्याप ठेकेदार मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.