गेले सांगून ज्ञाना-तुका,
झाला उशीर तरीही शिका..!
सोलापूर: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह राज्यातील प्रमुख संतांच्या पालखी सोहळ्यांत ‘उल्लास’कार्यक्रमाच्या प्रचारासाठी योजना शिक्षण संचालनालयाने ‘वारी साक्षरतेची’ हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली
केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२ ते सन २०२७ या कालावधीत वय वर्ष १५ व त्यापुढील असाक्षर असणा-या व्यक्तींना साक्षर करण्यासाठी केंद्रशासनामार्फत राज्यांच्या मदतीने राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या कार्यक्रमाचा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०२४ मध्ये प्रचार-प्रसार आळंदी ते पंढरपूर व श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर मार्गावर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी ‘उल्लास’ कार्यक्रमाची माहिती दर्शविलेली व्हॅन (मिनी बस) असून त्यामध्ये शिक्षक-स्वयंसेवकाचे एक पथक असेल. तसेच पालखी मार्गावर विविध ठिकाणी विविध माध्यमातून अभियानाचा कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. उदा. पथनाटय, बैनर, स्लोगन, घडीपत्रिका, घोषवाक्य असलेले फ्लेक्स इत्यादी. तसेच बारामती, इंदापूर, सासवड व लोणंद येथील मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळयातील असाक्षरांची नोंदणी शाळांच्या मदतीने केली जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी दोन्ही संस्थानाचे सहकार्य घेतले जात आहे. त्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांशी विचारविनीमय करून नियोजन करण्यात आले असल्याचे योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. या शिवाय महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून पंढरपूरकडे निघणा-या पालखी सोहळा मार्गावरील गावांमध्ये असे उपक्रम घेण्याबाबत या संचालनालयास्तराकडून निर्देश देण्यात आले आहेत.
- संपूर्ण पालखी सोहळया दरम्यान या साक्षरता कार्यक्रमाबाबत सहभागी असलेल्या सर्व वारक-यांना या निमित्ताने माहिती होणार आहे. पालखी सोहळा-वारी संपल्यानंतर वारकरी जेव्हा आपल्या मुळ गावी परत जातील तेव्हा तेथील जवळच्या शाळेशी संपर्क साधून आपली ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत असाक्षरांना सूचित केले जाणार आहे. तसेच संबंधित लगतच्या शाळेत असाक्षरांची स्वयंसेवकांबरोबर ऑनलाइन जोडणी (टॅगिंग) करुन त्यानंतर असाक्षरांना अध्यापन (शिकवणे) सुरु केलं जाईल. येत्या सप्टेंबर किंवा मार्च मध्ये होणा-या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षेसही त्यांना बसता येईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र मिळणार आहे.