सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपी संजय जाधव हा झेडपीच्या शाळेवर हजर नसतानाही त्याचा पगार निघाला आहे. हा चमत्कार कसा झाला. झेडपीच्या शिक्षण विभागात असे अनेक प्रकार सर्रासपणे सुरू असून त्याला कोणी कोणी साथ दिली आता याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत इतर शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
‘नीट” परीक्षा घोटाळ्यात लातूर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात सोलापूर झेडपी शाळेतील शिक्षक संजय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी गेले आहे. अटक केलेल्या आरोपी संजय जाधव याने ‘नीट” परीक्षा घोटाळ्यासंबंधी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे देशभर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. असे असताना सोलापूर झेडपी शाळेवर त्याने काय काय उद्योग केले? आता याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे कोकणातून सोलापूर झेडपीकडे बदलून आल्यावर त्याला पहिल्यांदा मोहोळ तालुक्यात नियुक्ती मिळाली. त्यानंतर माढा तालुक्यातून मागणी आल्यानंतर त्याला टाकळी येथील झेडपी शाळेकडे पाठवण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागाच्या रेकॉर्डवर त्याने सुमारे दहा महिने काम केले पण प्रत्यक्षात तो त्या शाळेवर गेलाच नाही. डमी शिक्षकाद्वारे त्याने आपली हजेरी दाखवली. हा प्रकार तेथील मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांना माहीत होता. तरीही त्याचा पगार काढण्यात आला. तो गैरहजर असताना पगार निघालाच कसा? आता असा सवाल उपस्थित झाला आहे. संगनमताने हा प्रकार सुरू होता, असा आरोप होत असून आता हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यामुळे शिक्षण विभागाची अडचण वाढणार आहे.
मोहोळ येथील विस्तार अधिकारी यादव यांच्याकडे माढा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार आहे तर पंचायत समितीकडील लिपिक कुंभार हे पगार काढण्याचे काम पाहतात. तो गैरहजर असताना पगार निघालाच कसा? त्यामुळे तेथील मुख्याध्यापक, विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुखांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी झेडपीच्या अनेक शाळावर डमी शिक्षक असून असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे. जगताप यांची मागणी गांभीर्याने न घेतल्यास भविष्यात असे आणखी प्रकार वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याला झेडपी शिक्षण विभाग खतपाणी घालत आहे, असा त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे ही साखळी तोडणे आवश्यक झाले आहे. अनेक शिक्षक गैरहजर असतानाही त्यांची रजा किंवा गैरहजेरी मांडली जात नाही. शाळांच्या तपासणीत यापूर्वी अशा बाबी उघड झाल्या आहेत. गुरुजीच खोटे बोलून पूर्ण महिनाभराचा पगार वसूल करत असल्याच्या अनेक घटना आहेत. अशा ‘नाणे” गुरुजींचा बंदोबस्त करा अशी जगताप यांनी मागणी केली आहे.