सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नंबर एकच्या संचालक मंडळ निवडणुकीचा उर्वरित टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुण्याचे सचिव अशोक गाडे यांनी जाहीर केला असून गरज भासल्यास 28 जुलै रोजी मतदान व त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नंबर एकच्या संचालक मंडळ निवडणूक सन 2023- 24 ते 2028- 29 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पतसंस्थेच्या 17 जागेसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया यापूर्वीच पार पडली आहे. यामध्ये सर्वसाधारण: 12, महिला प्रतिनिधी: 2, अनुसूचित जाती व जमातीसाठी एक, इतर मागास साठी एक आणि वि. जमाती व भटक्या जमाती, वि मा प्रवर्गासाठी एक अशा जागांचा समावेश आहे. या जागांसाठी दाखल केलेले नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत दोन जुलै ते 16 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत राहील.  अंतिम यादी व निशाणी वाटप करण्याचे काम 18 जुलै रोजी होणार आहे आणि त्यानंतर मतदान आवश्यक असल्यास 28 जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानंतर लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक कोठे घ्यायची हे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नंबर एकचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे सभासदांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. यावेळेस निवडणुकीत चुरशीचे वातावरण दिसत आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात परिवर्तन पॅनलने कंबर कसली असून एकतर्फी कारभाराच्या विरोधात सभासद एकवटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते सभासदांचा संपर्क सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आषाढी वारीच्या धामधुमीत पतसंस्थेच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *