सोलापूर : चिखल तुडवून मडक्यांना आकार देत अत्यंत बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन ज्या झेडपी शाळेत शिक्षण झाले त्याच झेडपी शाळेचा मुख्याध्यापक होण्याचा मान मंद्रूपच्या प्रकाश कुंभार यांना मिळाला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नुकत्याच ज्येष्ठ शिक्षकांना ऑफलाइन पद्धतीने नियुक्ती देण्याची मोहीम राबवली. शेवटची संधी म्हणून झेडपी शाळांवर असलेल्या सुमारे 3000 जेष्ठ शिक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते.  यातील केवळ 700 शिक्षकानी या विनंती बदलीचा लाभ घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, कक्ष अधिकारी होळकर यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.  या मोहिमेमध्ये दक्षिण सोलापुरातील येळेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यांनीही सहभाग नोंदवला होता. मुख्याध्यापकाच्या नियुक्तीत कुंभार यांचा 70 वा नंबर होता. त्यांचा नंबर जेव्हा आला त्यावेळी त्यांच्यासमोर बरूर व मंद्रूप झेडपी शाळेचा पर्याय होता. आधीच्या बऱ्याच शिक्षकांनी या शाळा नाकारल्या होत्या. समोर मंद्रूपचे नाव आल्यानंतर मुख्याध्यापक कुंभार यांनी तात्काळ होकार दिला. माझ्या गावी, ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेचा मुख्याध्यापक होण्याचा बहुमान याद्वारे मला मिळाला. मी जी स्वप्ने पाहिली होती ती साकार करण्याची ही संधी होती अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक कुंभार यांनी दिली आहे. समुपदेशामध्ये त्यांना मंद्रूपच्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक होण्याचा बहुमान मिळाला आहे.  यापूर्वी कुंभार गुरुजी यांनी इंदिरानगर जिल्हा परिषद शाळा येथे सहशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर पदोन्नतीवर येळेगाव येथे बदली झाली होती आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना स्वतःच्या गावी नियुक्ती मिळाली आहे. जिल्हा परिषद शाळेत ज्ञानार्जनाचे काम करताना विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळे द्यावे आणि शाळेमध्ये काहीतरी वेगळा उपक्रम करावा अशी कुंभार गुरुजींची नेहमीच धडपड राहिली आहे. कुंभार ज्याप्रमाणे माती मळून चाकावर मडक्यांना जसा विशिष्ट आकार देतो त्याप्रमाणे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जीवनातील आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात ते सतत चर्चेत आहेत. मंद्रूपमधील चौडेश्वरी यात्रेची परंपराही त्यांनी बदलली. आपल्या शिक्षकी पेशाचा उपयोग करीत बांधवांना एकत्र घेऊन यात्रेच्या माध्यमातून विविध मान्यवरांची व्याख्याने, किर्तन, पोवाडा, गीत, नाट्य, कलगीतुरा, सन्मानाचे कार्यक्रम घेऊन समाजामध्ये मोठी क्रांती घडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश म्हणून की काय त्यांना स्वतःच्या गावाच्या झेडपी शाळेवर नियुक्ती मिळाल्याची प्रतिक्रिया मित्र वर्गातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *