सोलापूर : सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची पकड ढिली झाल्यामुळे पुन्हा संजय जावीर, तृप्ती अंधारे आणि सुलभा वठारे यांची पुन्हा माध्यमिकला वर्णी लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची बदली झाल्यापासून माध्यमिक शिक्षण विभागाला नजर लागली आहे. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये आलेले मारुती फडके हे बीपी व शुगरने ग्रासल्यामुळे प्रदीर्घ रजा व अवेळी बदलून गेले. त्यामुळे प्रभारी कारभार सुरू झाला. सुलभा वटारे, जावेद शेख, नाळे, संजय जावीर, तृप्ती अंधारे आणि स्मिता पाटील यांना प्रभारी म्हणून कामकाज करावे लागले. त्यानंतर सचिन जगताप हे पूर्ण वेळ माध्यमिक शिक्षणाधिकारी मिळाले.सुरुवातीला जगताप यांनी कामाकडे लक्ष दिले. पण अलीकडे तेही कार्यालयात दिसत नाहीत. कोर्ट तारखा व बैठकांना पुणे व मुंबईला त्यांचे हेलपाटे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. शालार्थ आयडीचा प्रश्न अजून संपलेला नाही. त्यामुळे कार्यालयावर शिक्षकांची मोठी गर्दी असते. शिक्षणाधिकारी कार्यालयात आले म्हटले की मजला भरून जातो. त्याचबरोबर मुख्याध्यापक मान्यता, पदोन्नती, अधिकार, शालेय संच मान्यता ही कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिल्याने शाळांचे कामकाज कोलमडल्याचे दिसून येत आहे. कोणाची फाईल कोणाकडे आहे हे समजून येत नसल्याने गोंधळात भर पडत आहे. कार्यालयात उपशिक्षणाधिकारी व लिपिकांची अजूनही वाणवा आहे. काही शिक्षक बराच काळ गेल्यामुळे आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचेही टेन्शन वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बदलीसाठी त्यांनी बार्शीकरांकडून प्रयत्न सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे. जगताप यांची बदली झालीच तर आपल्यालाच नियुक्ती मिळावी यासाठी काहीजण प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक विभागाकडील उपशिक्षणाधिकारी जावीर यांची न्यायालयाच्या आदेशान्वये पदोन्नती झाली आहे पण त्यांना पोस्टिंग मिळालेली नाही. त्यामुळे माध्यमिक रिकामे झाले तर संधी मिळेल अशी त्यांनाही अपेक्षा आहे. योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्यावर बऱ्याच काळापासून अन्याय झाला. माध्यमिकचे पद रिक्त असताना व वरिष्ठ असतानाही त्यांना अतिरिक्त पदभार देण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे कायमची संधी मिळावी म्हणून वठारे यांचाही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त पदभार म्हणून कामकाज पाहिलेल्या व सध्या लातूर येथे असलेल्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी जागा रिक्त झाल्यास संधी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केला असल्याची माध्यमिक शिक्षण विभागात चर्चा आहे. जगताप सरांचा क्लास बंद झालाच तर यापैकी कोणाला संधी मिळणार की नवीन नाव पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.