सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या प्रगतीबाबत आनंदाची बातमी आहे. ई फायलींगमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने चौथ्या क्रमांकावर काम सुरू केले आहे. अशाच पद्धतीने ई फायलिंगच्या कामकाजाची पद्धत वाढल्यास कामाची गती वाढणार आहे यात शंका नाही.

जिल्हा परिषदेतील बऱ्याच कार्यालयात गेल्यावर टेबलावर व बाजूला फायलींचा ढिगारा असल्याचे चित्र दिसते. दररोज या फायलींचा निपटारा न केल्यास ढिगारा वाढत जातो.  त्यामुळे अनेकवेळा अर्जंट कामाच्या फायली सापडणे मुश्किल होते.  यातूनच फायली गहाळ होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येते.  बऱ्याच वेळा महत्त्वाच्या कामाच्या फायली हातोहात मिळत नाहीत.  त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. तर काही वेळा फायली गहाळ झालेल्या आढळतात.  यावर मात करण्यासाठी व कामांचा निपटारा वेगानं होण्यासाठी शासनाने ई फायलिंग सिस्टीम सुरू केली आहे. यासाठी इ ऑफिस नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. अलीकडे विभाग प्रमुखांनी या सिस्टीमचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. या सिस्टीममध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणते काम कोणत्या वेळी झाले याची अचूक माहिती मिळते. यासह वरिष्ठांकडून आलेल्या फायलींचा निपटारा हातोहात करणे सोपे झाले आहे. कामाबाबत आलेल्या फायलींमधून शेरा मारणे, सही करणे, अभिप्राय देणे, सूचना करणे हे काम सोपे झाले आहे. याशिवाय एकाच फायलीमध्ये सर्व कागदपत्रे असल्याने त्या- त्यावेळी दिलेले निर्णय शाबूत राहतात.  त्यात बदल करणे शक्य होत नाही किंवा फाईल गहाळ होत नाही.  यामुळे ही सिस्टीम सोयीची ठरणार आहे. पण अजूनही बरेच जण जुन्या पद्धतीनेच काम करताना दिसतात. इ फायलिंग मध्ये काम करणे अवघड असल्याचे काहींचे म्हणणे आहे. निर्णय घेतलेल्या पाहिली सिस्टीममध्ये नोंद करून पुढे पाठवण्यात अनेकजण धन्यता मानत आहेत. प्रस्ताव तयार करणे व त्यावर संबंधित अधिकाऱ्यांचे नोट घेणे, नस्ती जपून ठेवणे ही कामे ई फायलिंगमध्ये अवघड असल्याचे सांगितले जाते. पण यामुळे कागद व वेळेची बचत होते. ई पेपर जपून राहतात प्रत्यक्ष कागद आग, पाणी, वाळवी व उंदराच्या प्रादुर्भावाने नष्ट होण्याची भीती असते.  त्यामुळे शासनाने कार्यालयीन कामकाजाची गती वाढवण्यासाठी सुरू केलेली ही फायलिंग ही सिस्टीम अधिकाधिक गतिमान करणे गरजेचे झाले आहे. शासनाने हळूहळू प्रत्येक शासकीय कार्यालयात याचा वापर सुरू केला आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये ही सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.  त्यात राज्यातील चार जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे ही नाव आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना या सिस्टीममधून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी या सिस्टीमच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिले आहे. मुख्यालयस्तरावरच ही सिस्टीम लागू आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, महिला व बालकल्याण आणि लेखा विभागाचे काम सुकर झाले आहे.

शासनस्तरावर व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आलेले संदेश व कामाबाबत मी ई-फायलिंग सिस्टीममधून काम करीत आहे. यामुळे कोणते काम कधी झाले व त्यावर काय अभिप्राय दिला याची लागलीच माहिती मिळते. मोबाईल, नोटपॅड व संगणकावरही हे काम करणे सोपे झाले आहे. यामध्ये फाईल गहाळ होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे कामे हातोहात मार्गी लागताना दिसत आहेत. या सिस्टीमचा वापर वाढल्यास कामे वेगाने होणार आहेत.

संतोष कुलकर्णी,

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *