सोलापूर : मंद्रूप तालुका होण्यासाठी परिसरात एमआयडीसी होणे गरजेचे आहे. पण येथील शेतकऱ्यांनी जमीन न दिल्यास माळकवठे व कंदलगाव येथील शेतकऱ्यांच्या प्रस्तावाचा विचार करू अशी भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी शेतकऱ्यांपुढे मांडली आहे.
मंद्रूप परिसरातील शेतकरी मुत्याप्पा वाडकर, प्रभू वाडकर, सोमनाथ वाडकर, दयानंद धनशेट्टी, सुमित्रा मैत्रे व गंभीरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी गौरीशंकर मेंडगुले यांच्याबरोबर शनिवारी आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेतली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून यापूर्वी रद्द झालेली एमआयडीसी नव्याने मंजूर करून घेतल्याबद्दल या शेतकऱ्यांनी आमदार देशमुख यांचे अभिनंदन केले. त्यावर आमदार सुभाष देशमुख म्हणाले मंद्रूप तालुका होणे गरजेचे आहे. यासाठी येथील तरुणांना आधी रोजगाराची संधी उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे एमआयडीसीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. पण शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे नियोजित एमआयडीसी रद्द झाली. मंद्रूप ग्रामपंचायत निवडणुकीनंतर परिसरातील शेतकरी व अनेक तरुण यांनी पुन्हा एमआयडीसीबाबत आपली भूमिका मांडली. केवळ जमिनीचा मोबदला न ठरल्यामुळे विरोध झाला. एमआयडीसीला विरोध नव्हताच अशी बाजू समोर आल्यावर आमदार देशमुख यांनी पुन्हा नव्याने एमआयडीसीला मंजुरी घेतली आहे. परंतु शेतकरी जमिनीला पाचपट भाव मिळावा अशी भूमिका मांडत आहेत.
याबाबत बोलताना आमदार देशमुख म्हणाले मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांनी आपली संमती देताना जमिनीच्या भावाबाबत स्पष्टीकरण द्यावे. याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करेन. मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन न दिल्यास माळकवठे व कंदलगाव येथील शेतकऱ्यांनी आमच्या गावात एमआयडीसी आणा असा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे या पर्यायाचाही मला विचार करावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. मंद्रूपमध्ये अलीकडे बाजारपेठ विकसित होत आहे. तरुणांना रोजगार नाही. त्यामुळे अनेक जण शहराकडे जात आहेत. स्थानिक पातळीवरच कारखाने निर्माण झाल्यास तरुणांना मोठा रोजगार मिळणार आहे. शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतीचा चांगला मोबदला मिळावा यासाठी मी पाठपुरावा करणारच आहे. शेतकऱ्यांनी आपल्या भावी पिढीचा विचार करून याबाबत पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केल्याचे गौरीशंकर मेंडगुले यांनी सांगितले.