सोलापूर : नोकरी नाही म्हणून अनेक तरुण बेरोजगारीला लाखोली वाहत सरकारच्या नावाने खडे फोडत बसून राहताना दिसतात. पण जिद्द असली की काय घडू शकते याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. मंद्रूपच्या एका तरुण शेतकऱ्याने अशी जिद्द बांधली आणि केवळ फुल शेतीवर त्यांनी बंगला बांधून आपले स्वप्न खरे करून दाखवले आहे.
प्रशांत रघुनाथ साठे ( राहणार मंद्रूप, तालुका दक्षिणसोलापूर) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सात-आठ वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाल्यावर प्रशांत आणि त्यांची पत्नी अंबिका या दोघांनी नेटाने संसार केला. राहायला घर नव्हते म्हणून फुल शेतीवर राबून त्यांनी घराची उभारणी सुरू केली. पण गवंड्याने गुण्यामध्ये बांधकाम चुकवले. त्यामुळे पाच- सात लाख रुपये खर्चून बांधलेल्या घराच्या कॉलम व भिंती त्यांनी पाडून टाकल्या. त्यामुळे जिद्दीने बांधलेले घराचे छतही गेले. ऊन- वारा व पावसाच्या मारा सोसत त्यांनी घडल्या प्रकारची खंत न बाळगता आनंदाने वाटचाल सुरू ठेवली. डोईवर छत नसताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली संसार थाटला. वादळ पावसात दुसऱ्याच्या वस्तीवर आसरा घेऊन पुन्हा नवीन घर उभारण्याचे स्वप्न पाहिले. पुन्हा या दोघांनी जिद्दीने फुल शेतीवर पै- पै गल्ल्यामध्ये गोळा करून शेवटी बंगला उभा केला. कोणाकडे उसनवारी न करता व कुठलेही कर्जही न काढता त्या दोघांनी जिद्दीने आपले स्वप्न तडीस नेल्याबद्दल सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
वडिलोपार्जित मिळालेल्या शेतीत दिवसभर कष्ट उपसून पुंजी गोळा करून आपला संसार सुखाचा होऊ शकतो हे या जोडीने दाखवून दिले आहे. जेमतेम शिक्षण असताना नोकरी नाही म्हणून सरकारला दोष देत भटकणाऱ्या सुशिक्षित तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारी अशी या दोघांची ही सक्सेस स्टोरी आहे. निशिगंध, बेला, जुई या फुलांवर या दोघांनी आपला बंगला उभा केला. इतकेच नव्हे तर शेतात दिवसभर राबून नारळ, चिंच व आंब्याची झाडे बांधावर जोपासली आहेत. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात त्यांचे कष्टाचे घर आणखीन खुलून दिसत आहे.