सोलापूर : गतवर्षी नुकसान झालेल्या खरीप पिकाचे भरपाई शासनाने मंजूर करून सहा महिने लोटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेले नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंधरा दिवसांपूर्वी भरपाईची रक्कम जमा करण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे. पण केवायसी करून दोन महिने झाले तरी रक्कम मिळाली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावर शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली. पण अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्याआधी तलाठी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना संदेश पाठवून केवायसी करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यावरून बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन केंद्रावर जाऊन केवायसी करून घेतली आहे. त्यांना प्रमाणपत्रही मिळाले आहे. पण लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर जमा झाली नव्हती. आता निवडणूक संपून महिना लोटला आहे. पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पीक विम्याची रक्कम मंजूर झाल्याचे सांगतानाच नुकसान भरपाईची रक्कमही लवकरच शेतकऱ्यांना मिळेल, असे आश्वासन दिले होते. पण बराच कालावधी लोटला तरी रक्कम जमा न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. पुष्य नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपाच्या उर्वरित पेरण्यांना वाफसा आल्यानंतर वेग येणार आहे. बियाणे व खतासाठी शेतकऱ्यांना पैसे लागणार आहेत. भरपाईची रक्कम हाती आली असती तर सोय झाली असती अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.