सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अक्कलकोट तालुका सीमावृत्ती भागात कन्नड व उर्दू शाळेवर मराठी शिक्षक नियुक्त केल्याने पालकांचा विरोध वाढला आहे. जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते काका साठे यांच्या नेतृत्वाखाली कुल जमाती तंजिम या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेत हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळेवर मराठीतून शिक्षण झालेल्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे. अशा 38 शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने नियुक्ती देण्यास विरोध केला होता. त्यावेळी या शिक्षकांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करून शाळांवर नियुक्ती मिळवली आहे. मराठी भाषेतून शिक्षण घेतलेले हे शिक्षक शाळेवर गेल्यावर कन्नड व उर्दू माध्यमाचा अभ्यास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या शाळांमधील पालक संतप्त झाले आहेत. कन्नड माध्यमाच्या शाळातील पालकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन तक्रार केली आहे. कर्नाटक सरकार कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या सीमावृत्ती भागातील शाळांना दरवर्षी अनुदान देते त्यामुळे या सरकारने महाराष्ट्र सरकारला कन्नड शिक्षक नियुक्ती विषय विनंती करावी अशी या पालकांची मागणी आहे तर आता उर्दू माध्यमाचे पालकही संतप्त झाले आहेत. उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये बिगर उर्दू भाषिक शिक्षकांच्या नेमणुकीला कुल जमाती तंजिम या संघटनेने विरोध केला आहे. या संघटनेचे अध्यक्ष मौलाना ताहेर बेग, इनुस डोणगावकर, जावेद बक्षी, मतीन बागवान, इकबाल उस्ताद, माजी महापौर आरिफ शेख शफिक काझी, डॉ. फारुख मुल्ला यांच्यासह काका साठे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. कन्नड व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना या नवीन शिक्षकांनी शिकवलेलं कळत नसल्याने याबाबत मार्ग काढा अशी विनंती साठे यांनी केली आहे.