सोलापूर : यंदा महाराष्ट्रभर समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे मानाच्या पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. पावसाचे दिवस पाहता वारकऱ्यांच्या सेवेसाठी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रेनकोट द्या अशी मागणी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी .मनीषा आव्हाळे यांनी 10 जुलै रोजी आषाढी यात्रा नियोजन पाहणी करण्यासाठी पंढरपुरातील पालखी मार्गाचा दौरा केला. वाखरी पालखीतळ येथे त्या आल्या असता उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्य विषयक कामकाजाची माहिती घेऊन मार्गदर्शन केले.कामकाजाबाबतीत समाधान व्यक्त करून वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेबाबत सतर्क राहण्याविषयी आदेशीत केले. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना अडीअडचणीही विचारल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्यअध्यक्ष शिवराज जाधव यांनी पुरुष व महिला आरोग्य कर्मचारी वारीमध्ये पावसातसुद्धा आरोग्य सेवा देतात. त्यांना रेनकोट पुरविण्यात यावेत अशी मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना दिल्या.निश्चितच रेनकोटचे पुरविण्याचे नियोजन करण्यात येतील असे आश्वासीत केले. यावेळी प्रमोद जावळे’, फिरोज शेख, नंदकुमार पोतदार, मोहन यादव,प्रमोदकुमार म्हमाणे, बापू सवणे, शशिकांत साळुंखे ,धनाजी मस्के,बबन कसबे, समाधान रणदिवे, दादा शेटे ,विजय दंदाडे,अंशुमन शिंदे उपस्थित होते.
शेगावच्या वारकऱ्यांना किट
शेगावच्या गजानन महाराज पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांना यंदा प्रथमच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत औषधाचे किट देण्यात आले मुख्य कार्यकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते शंभर वारकऱ्यांना औषधाचे देण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, माध्यम अधिकारी धनंजय वाळा, रफिक शेख उपस्थित होते.