सोलापूर : पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी N नंबर काढण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार नागरिकांनी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब देताना केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर गावभेटीदरम्यान कासेगाव ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे धान्य चालू करण्यासाठी तब्बल दोन हजार रुपयाची मागणी करीत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यावरून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रत्यक्षात तपासणी करीत पंढरपूर प्रांत, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, मोहोळ पुरवठा निरीक्षक व सोलापूर पुरवठा निरीक्षक यांची चौकशी समिती नियुक्ती केली होती. बुधवारी या पथकाने कासेगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा जाबजबाब घेतले . यावेळी ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे तहसील कार्यालयात बसून N नंबर काढण्यासाठी पाचशे रुपये तर अन्नसुरक्षा यादीत नाव समाविष्ट करून धान्य चालू करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये मागणी करीत असल्याचे जबाबमध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे. नागरिकांनी स्वतःहून समितीसमोर आपण दिलेल्या जबाबचा मोबाईलमधून चित्रीकरण करून घेतले आहे. जेणेकरून पंढरपूर तहसील कार्यालयात या चौकशीत कोणताही फेरबदल करता येऊ नये. तसेच कोणताही राजकीय दबाव येऊ नये. यावरून चौकशीदरम्यान जाबजबाब आणि त्यावर होणारी कारवाई ही पारदर्शकपणे होणार ह्यात शंकाच नाही अशी प्रतिक्रिया तक्रारदार नागरिकांनी दिले आहेत. यावरून पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे आता चांगलेच कोंडीत अडकले असून आपल्या बचाव करण्यासाठी इतर दुकानदाराकडून ढोबळ जाबजबाब घेत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. चौकशी समितीने अशा प्रकारे इतरांचा जाब जबाब घेऊन नाईक यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून असा इशारा तक्रारदार नागरिकांनी दिला आहे.
पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर निलंबणाची कारवाई करावी. नागरिकांनी केलेल्या आरोपावरून फौजदारी गुन्हा दाखल करावा जेणेकरून भविष्यात कोणत्याही पंढरपूरातील नागरिकांची अशी पिळवणूक होणार नाही.
-शिवाजीराजे देशमुख, तक्रारदार, ग्रामस्थ कासेगाव पंढरपूर.
पुरवठा निरीक्षक नाईक हे N नंबर काढण्यासाठी पाचशे रुपये, तर अन्न सुरक्षा यादीत धान्य चालू करण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी माझ्याकडे केलेली आहे, याबाबत मी जबाब दिलेला आहे.
विलास यादव, तक्रारदार,कासेगाव पंढरपूर.