सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सग्गम ते मोमीन नगर काँक्रिट रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मंजूरी मिळाली आहे. या रस्त्याची पाहणी मंगळवारी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

प्रमुख जिल्हामार्ग अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील सग्गम नगर पासून मोमीन नगरपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या रस्त्यासाठी निधीची मागणी करून पाठपुरावा केला होता. हा रस्ता १४ मीटरचा असून त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी साचू नये यासाठी स्ट्रॉंम लाईन टाकण्यात येणार आहे. तसेच पादचाऱ्यांसाठी पदमार्ग असणार आहे. या रस्त्यासाठीच्या निविदा पुढील १५ दिवसांत काढण्यात येणार आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या पाहणीप्रसंगी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपअभियंता श्रीकांत गायकवाड, सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, बाळासाहेब शेळके, चेतन पाटील उपस्थित होते.

२५ हजार नागरिकांची सोय 

सग्गम नगर ते मोमीन नगर दरम्यान होणाऱ्या रस्त्यामुळे या परिसरातील सग्गम नगर, बागवान नगर, मंत्री चंडक, केकडे नगर, जुना घरकुल, मुळेगाव रोड आदी परिसरातील सुमारे २५ हजार नागरिकांची सोय होणार आहे. या रस्त्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांचे आभार मानले. तसेच पद्मशाली स्मशानभूमीसाठी तीस लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल फलमारी यांनी आमदार देशमुख यांच्या आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *