जिल्हा परिषदजिल्हाधिकारी कार्यालयमहाराष्ट्रसोलापूर

हिरकणी कक्षाने केली महिला वारकऱ्यांची वारी सुकर

सोलापूर झेडपीमध्ये असं पहिल्यांदा घडलं...

सोलापूर : पंढरपुरातील आषाढी एकादशीनिमित्त भरणाऱ्या वारीसाठी विविध संतांच्या पालखी सोहळ्यांबरोबर पायी चालत येणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या हिरकणी कक्षाने मोठी सोय केली. त्यामुळे महिला वारकऱ्यांची वारी सुकर झाल्याचा अनुभव अनेक वारकऱ्यांनी कथन केला आहे.

आषाढी वारी सोहळ्यानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज गेले पाच दिवस थांबले होते.  आषाढी एकादशीनंतर गुरुवारी कार्यालयात पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. अजूनही ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी पालखी मार्गावर स्वच्छता व इतर कामासाठी ठाण मांडून आहेत. गेले पंधरा दिवस त्यांची या मार्गावर सेवा सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासाठी ‘वारी नियोजन” हा पहिल्यांदाच विषय होता. यंदा जूनपासून राज्यभर पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानकारक पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे वारीला गर्दी होणार असा अंदाज पहिल्यापासून गृहीत धरण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वारीपूर्वी पंढरपुरात येऊन बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला होता. पालखी मार्गावर वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मोठी दक्षता घेतली होती. या दोघा आयएएस अधिकाऱ्यांना आषाढी वारीचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे या दोघांनी स्वतः मार्गावर जाऊन प्रत्येक सुविधांच्या नियोजनाची खातरजमा केली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी संवेदनशीलपणे महिला वारकऱ्यांचा प्रश्न जाणून पालखी मार्गावर 92 हिरकणी कक्षाचे नियोजन केले होते.  पालखी मार्गावरील गर्दी लक्षात घेता सहा कक्ष वाढवण्यात आले. 98 हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिला वारकऱ्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या. त्यामध्ये सॅनिटरी पॅड, आरोग्य तपासणी, मसाज या सुविधा महत्त्वपूर्ण ठरल्या. हिरकणी कक्षाची जबाबदारी असलेले महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले म्हणाले की 98 कक्षाच्या माध्यमातून आम्ही महिला वारकऱ्यांच्या सुविधा पुरवल्या. महिला वारकऱ्यांना ज्या- ज्या अडचणी आल्या त्या- त्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर वारीच्या काळातच शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना जाहीर केली. त्याची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागावर देण्यात आली आहे. या योजनेच्या प्रचारासाठी फिरते वाहन ठेवण्यात आले. आत्तापर्यंत एक लाख 62 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज अंगणवाडीत आले असून त्यापैकी 65 हजार अर्ज ऑनलाईन अपलोड करण्यात आले आहेत. महसूल विभागाकडे दाखल झालेल्या अर्जांची आकडेवारी वेगळी आहे.

या आषाढी वारीच्या वेळेस जिल्हा परिषदेत पाच दिवस शुकशुकाट होता. असे पहिल्यांदा घडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचे पहिल्यांदाच आदेश काढण्यात आले होते.  त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच अधिकारी पालखी मार्गावर आपल्या नेमून दिलेल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button