सोलापूर: ” चल ग सखे… कुठं? शिकायला.. नवभारत साक्षरता.. असं आलय अभियान….एकेक अक्षर शिकून सारे इतिहास घडवा नवा… पाळणा साक्षरतेचा… ओवी साक्षरतेची गात साक्षरतेचा संदेश देणारा ” वारी साक्षरतेची “हा प्रबोधन स्वरचित गीतांचा “फेसबुक आणि युट्युब लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात मोहोळ येथे संपन्न झाला..
शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने उल्हास नवभारत साक्षरता अभियानाच्या प्रसारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कुमाार आशीर्वाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहोळ येथे झालेल्या या कार्यक्रमात मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा स्वानंद टिचर्स म्युझिकल ग्रुपच्यावतीने या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. स्वानंदच्यावतीने साक्षरतावर आधारित स्वरचित गीते, अभंग, गवळण, पाळणा, ओवी विविध घोषणा देत हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. फेसबुक व युट्यूबवर संपूर्ण राज्यात हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. शिक्षणाधिकारी (योजना ) सुलभा वटारे यांच्या मार्गदर्शनाखाली गायक रुपेश क्षीरसागर, महेश कोटीवाले, एकनाथ कुंभार, किरण कुमारी गायकवाड, अरुंधती सलगर, कालिंदा यादव, हेमलता होट कर यांनी जनजागृतीपर गीते सादर केली. लाईव प्रसारणसाठी डायटचे प्रा. बुधाराम, विषयतज्ञ लक्ष्मण भोसले, तंत्रस्नेही दीपक पारडे,रमेश साठे यांनी परिश्रम घेत याचे प्रसारण केले. सूत्रसंचालन सुलभा वटारे व हेमलता होटकर यांनी केले. आषाढी वारीला राज्यभरातून अनेक वारकरी येतात. यात बरेच अशिक्षित असतात. या वारकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी वारीमध्ये साक्षरता दिंडी काढण्यात आली. शासनाकडून साक्षरतेच्या प्रचारासाठी असा प्रयत्न होत असल्याचे वारकऱ्यांना माहित व्हावे हा, ही वारी काढण्यामागचा उद्देश होता, असे योजना विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.