सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदाराची वाहतूक केल्याच्या आरोपातून इम्रान तांबोळी (वय २७, रा.मोदीखाना सोलापूर) या रिक्षा चालकाची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्हीपी कुंभार यांनी निर्दोष मुक्तता केली. कोणत्या उमेदवाराच्या सांगण्यावरून आरोपीने हे कृत्य केले हे पोलिसांना शाबित करता आले नाही.
21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभेसाठी मतदान सुरू होते. सातरस्ता येथील मनपा मुलांची केंद्र शाळेतील बूथ क्रमांक 137 ते 177 या मतदान केंद्रावर मतदान सुरू असताना यातील फिर्यादी पोलीस हवालदार दत्तात्रय कांबळे हे पोलीस गस्त घालीत या मतदान केंद्रासमोर आले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी इम्रान हा एम एच १३ सिटी 48 31 या क्रमांकाच्या रिक्षातून मतदारांना आणून केंद्रावर सोडत होता. केंद्रासमोरील सार्वजनिक रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा होत असल्याने गस्तीला असलेल्या पोलिसांनी त्याला दोनदा समजावून सांगितले तरी आरोपी इम्रान हा रिक्षातून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून सोडत होता. त्यामुळे बंदोबस्तातील पोलिसांनी त्याला पकडले भा.द.वि 188, 341, 268 व लोकप्रतिनिधी कायदा कलम 123 (5) प्रमाणे सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस फिर्यादी हवालदार कांबळे, पंच शिवबा टंकाळे, सुरेश लेंडवे, संदीप धर्मे, उत्तप्पा बिराजदार यांची साक्ष तपासण्यात आली. आरोपीतर्फे बचाव करताना आरोपीचे वकील जहीर सगरी यांनी आरोपी इम्रान हा मतदान केंद्रावर रिक्षातून मतदारांना आणून सोडत होता. कोणत्या उमेदवाराच्या सांगण्यावरून व त्याचे भाडे किती ठरले होते? कोणत्या मतदारांना त्याने आणून सोडले याबाबत पोलिसांकडून पुरावा मिळालेला नाही, हे कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले. यावरून कोर्टाने सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात सरकारतर्फे मनोज व्हनमारे यांनी काम पाहिले.