सोलापूर : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळलेल्यांमध्ये विजयसिंह मोहिते- पाटील, विजयकुमार देशमुख यांच्यानंतर दत्तात्रय भरणे यांचेच नाव लोकांच्या तोंडी आहे. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा मात्र सद्यस्थितीत लोकसंपर्क कमी पडत असल्याचे दिसून आले आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुती सरकारमधील पालकमंत्री बदलणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पद कायम राहिले आहे. सोलापूर जिल्ह्यातही पालकमंत्री बदलण्याची चर्चा होती. त्यामुळे हे पद कोणाला मिळणार यात बरीच नावे पुढे आली होती.  पण आता ही चर्चा थांबल्याने पालकमंत्री पाटील यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.  संपर्क कमी पडू लागल्याने त्यांची  जनतेतून लोकप्रियता कमी झाल्याचे दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री असताना उलट त्यांची सोलापूर जिल्ह्यावर जबरदस्त पकड होती.   लोकसभा निवडणुकीनंतर आता केव्हाही विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्यामुळे नागरिकांना पुन्हा आचारसंहितेच्या निर्बंधांना तोंड द्यावे लागणार आहे. लोकसभेची आचारसंहिता सुमारे पावणे दोन महिने चालली. यामुळे लोकांची अनेक कामे अडली. किमान आता तरी विकासकामांना  वेग येईल  असे वाटत असताना आता विधानसभा तोंडावर दिसत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 25 जुलै रोजी बोलावलेली जिल्हा नियोजनची सभा तीन ऑगस्टला पुढे ढकलली आहे. पालकमंत्री पाटील यांचे आत्तापर्यंतचे नियोजित दौरे असेच अनिश्चितपणे झाले आहेत. लोकांमध्ये मिसळण्यासाठी त्यांना वेळच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांतदादा पालकमंत्री झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. तसेच यादरम्यान  सोलापुरात त्यांच्यावर शाईफेक झाल्यामुळे  पोलिसांना सुरक्षा कडक करावी लागली. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आल्यामुळे पालकमंत्री बदलणार अशा चर्चेला बळ मिळाले होते.

सोलापुरात पालकमंत्री म्हटले की अजूनही दत्तात्रय भरणे यांचे नाव निघते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चार वर्षात पाच पालकमंत्री बदलले गेले. कोरोना महामारीच्या काळात भरणे यांनी लोकांमध्ये मिसळून केलेल्या कामामुळे त्यांचे नाव झाले. विकास कामाच्याबाबतीत त्यांनी सर्वांना सामावून घेऊन काम केले. पालकमंत्री म्हणून कामाची अशी पद्धत यापूर्वी विजयसिंह मोहिते- पाटील, विजयकुमार देशमुख यांनी राबविल्यामुळे  त्यांचे अजूनही नाव  निघते. त्याचबरोबर आर. आर. पाटील  लक्ष्मणराव ढोबळे, विखे- पाटील  यांच्याही कार्याची लोकांमध्ये छाप दिसून येते. आगामी विधानसभा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांना लोकांसाठी वेळ द्यावा लागणार आहे . महापालिका प्रशासनाने सार्वजनिक नळाचे पाणी वापरणाऱ्यांनाही घरगुती पाणीपट्टी लागू केल्याचा प्रश्न आमदार विजयकुमार देशमुख यांना विधानसभेत उपस्थित करावा लागला. सत्ताधाऱ्यांची ही अवस्था मग इतरांचे काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. महापालिका व जिल्हा परिषदेवर प्रशासकराज असल्याने व त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने त्याचा फटका भाजपला बसू शकतो, अशी भाजपच्याच कार्यकर्त्यात चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *