सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ (वय: 61, राहणार छत्रपती संभाजीनगर ) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाल्याचे वृत्त आहे.

प्रकाश वायचळ हे सहा महिन्यापूर्वीच उद्योग विभागाचे आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते. सन 2018 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते नियुक्त झाले होते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी चांगले काम केले. सोलापुरातून बदली होताना त्यांच्यावर अन्याय झाला होता. आयएएसच्या पदोन्नतीच्या यादीत पहिले नाव असतानाही अनफिट  असा शेरा मारून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. अहमदनगरच्या जात पडताळणी समितीवर असताना ते निवृत्त झाले. झालेल्या अन्यायाबाबत वायचळ यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. याबाबत लोकमतचे त्या वेळचे वरिष्ठ उपसंपादक राजकुमार सारोळे यांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय प्रशासक समितीने याची गंभीर दखल घेतली.निवृत्त झाल्यानंतर त्यांना आयएएस समितीने पदोन्नती मान्य करून उद्योग विभागाचे आयुक्त पदोन्नती देण्यात आली. या पदावर 77 दिवस त्यांनी कामकाज पाहिले. निवृत्तीनंतर आयएएस अधिकारी म्हणून कामकाज पाहणारे देशातील ते पहिले अधिकारी ठरले. या निवृत्तीनंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले. 12 जुलै रोजी त्यांच्या कन्येचा थाटामाटात विवाह सोहळा झाला होता. या आनंदात ते असताना शुक्रवारी सायंकाळी ही वाईट बातमी कळाली. त्यांच्या निकटवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे ते बेडरूममध्ये आराम करण्यासाठी गेले. सायंकाळी साडेसात वाजता प्रतिसाद न आल्याने जवळ जाऊन पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *