सोलापूर : घरची परिस्थिती बेताची. दहावीत 82 टक्के मार्क मिळूनही परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी सायकलवरून चहा विक्री करतोय विजापूर रोडवरील विद्यार्थी. सार्थक असे या जिद्दी मुलाचे नाव आहे.
- सार्थकचे वडील योगेश हे विजापूर नाका झोपडपट्टीत राहतात. ते चालक असूनही काम मिळत नसल्याने घरीच बसून असतात. आई जयश्री ही धुणीभांडी करून घर भागवते. लहान भाऊ समर्थ हा नेहरूनगर येथील पोस्ट बेसिक आश्रम शाळेत दहावीत शिकत आहे. सार्थक हा ज्ञानसंपदा शाळेत शिकत होता. दहावीत त्याला 82.20% मार्क पडले आहेत. विजापूर रोडवरील ठोकळ जुनिअर कॉलेजमध्ये कॉमर्स विभागातून त्याने अकरावी प्रवेश घेतला आहे. व्यापारात त्याला यश मिळवायचे आहे. आईला हातभार भावाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्याने स्वतःच व्यवसाय सुरु केला आहे. दहावीची परीक्षा दिल्यानंतर सायकलवरून त्याने विजापूररोड परिसरात चहा विक्रीला सुरुवात केली. शासकीय रुग्णालयात ही त्याने सेवा देण्याचा प्रयत्न केला. पण तेथील सुरक्षा रक्षकाने त्याला तेथे येण्यास मज्जाव केला. यादरम्यान विजापूररोड, जुळे सोलापूर परिसरात सायकलवर फिरून त्याने ओळख वाढवली. स्वतःचा मोबाईल क्रमांक सर्व दुकानदारांना दिला. यातून दुकानात पाहुणेमंडळी आल्यावर दुकानदार त्याला फोन करून आवर्जून चहासाठी बोलावून घेतात. यातून त्याला आता दररोज शंभर ते दीडशे रुपये कमाई सुरू झाली आहे. यातून पै-पै गोळा करून माझे व भावाचे शिक्षण पूर्ण करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे यांनी सार्थकची जिद्द पाहून त्याला शैक्षणिक साहित्यासाठी मदत करण्याचे ठरविले आहे. उच्च शिक्षण घेतलेले अनेक तरुण काही कामधंदा नाही म्हणून निवांत बसून असतात. पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता लागून राहिलेली असते. अशा बेरोजगारांनी सार्थकच्या जिद्दीचे कौतुकच करावे लागणार आहे. सार्थकला त्याच्या शैक्षणिक कार्यासाठी कोणाला मदत करावयाची असल्यास 7276579455 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.