सोलापूर : फायनान्स घोटाळाप्रकरणी अखेर मंद्रूप झेडपी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव गुरुजी यांच्यासह सात जणांविरुद्ध सदर ब झा र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश पवार (वय 41 रा. अभिषेक पार्क, धुम्मा वस्ती, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रूप झेडपी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी नामदेव जाधव, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा सचिन, सून पूजा, मुलगी सुजाता सचिन चव्हाण, सीमा वीरधवल शहा, अर्चना प्रवीण देशपांडे (सर्व राहणार मंद्रूप) यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316 (2), 318(3), 318 (4) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पवार यांची आरोपी जाधव गुरुजींबरोबर झेडपीच्या शिक्षण विभागात गेल्यावर ओळख झाली होती. 12 सप्टेंबर  2022 रोजी जाधव गुरुजींनी  संत सेवालाल निधी लिमिटेडच्या संचालकांनी ठेवल्यास जास्तीचा परतावा देण्याचे ठरवल्याचे सांगितले. अशाप्रकारे जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी पवार यांच्याकडून 50 हजाराची एफडी घेतली. त्यानंतर मुदत संपल्यावर एफडी व त्यावरील 11000 व्याज असे 61 हजार रुपये न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे हे करीत आहेत.

कोट्यावधींची फसवणूक 

जाधव गुरुजींनी संत सेवालाल लिमिटेड च्या माध्यमातून मंद्रूप व परिसरातील अनेक लोकांकडून जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून पैसे घेतले आहेत. ही रक्कम कोट्यावधीच्या घरात जात आहे. याबाबत संबंधित ठेवीदारांनी जाधव गुरुजी यांच्या विरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहेत. पण तक्रार अर्जावरील चौकशीवेळी जाधव गुरुजीने पैसे परत देण्याचे आश्वासन दिले पण मुदतीनंतरही कोणालाही पैसे दिले नाहीत. त्यामुळे हा घोटाळा कोट्यावधीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तिविण्यात येत आहे.

हेच ते नाणेगुरुजी…

मंद्रूप जिल्हा परिषद केंद्र शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना जाधव गुरुजींनी खूप चांगले काम केले. त्यांच्या कामाची प्रशंशा होत असतानाच फायनान्सचा त्यांना नाद लागला. त्यांचा दिनक्रम फायनान्समध्ये सुरू झाला. लोकांना ज्यादा व्याज देण्याचे आमिष दाखवून.अनेकांकडून पैसे घेतले. झेडपीतील शिक्षक, आरोग्य विभागातील कर्मचारी, मंद्रूप, माळकवठे,  वडकबाळ, कंदलगाव शिवारातील अनेक नागरिक व व्यापाऱ्यांनी  घरातील सोन्याचे दागिने मोडून, राष्ट्रीयकृत बँकातील एफडी तोडून, सेवानिवृत्तीमधील पैसे सेवालाल निधीमध्ये गुंतवले. पण सन 2024 च्या नवीन वर्षापासून गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाल्यानंतर तक्रारी वाढल्या. त्यामुळे जाधव गुरुजींच्या फायनान्सची वसुली बंद पडली. यानंतर त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी सुरू झाल्यावर “सोलापूर समाचार’ ने या “नाणे गुरुजीं’ च्या पराक्रमाबाबत  सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *