सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पालकमंत्री पाटील व महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या नावाला भाजपमधूनच विरोध सुरू झाला आहे. लोकसभेत फटका खाल्ल्यानंतर परका उमेदवार आम्हाला नकोच, अशी भूमिका भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी सर्वेक्षण व इतर कामाला सुरुवात करू काय? अशी त्यांनी मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओके, विल चेक इतकेच उत्तर दिले आहे. त्यामुळे गुडेवार यांनी अद्याप शहर मध्य मधून कामकाजाला सुरुवात केलेली नाही. पण गेल्या वर्षभरापासून या भागातील प्रमुख नेत्यांची त्यांची भेटगाठी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सोलापुरात कोल्हापुरातील मंडळी सर्वेक्षण करीत असल्याची बाब उघड झाली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील माहिती या सर्वेक्षकांकडून घेतली जात आहे. मीडियाचा हा खाजगी सर्वे असल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात भाजपमध्ये वेगळी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील विकासकामांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यांचे सोलापूरकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
या घडामोडी दिसून आल्यानंतर मनपाचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी जाहीर वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या उमेदवाराचा पराभव कशामुळे झाला? याचे चिंतन होण्याची गरज आहे. परका उमेदवार लादल्याने लोकांमध्ये विरोधाची लाट दिसून आली. याचा धडा घेऊन आता तरी विधानसभेसाठी कोणताही परका उमेदवार लादू नये, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपमध्येच या विषयावरून खदखद सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री पाटील हे बऱ्याच दिवसानंतर शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर ते काय संवाद साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.