सोलापूर : मंद्रूपच्या संत सेवालाल निधी बँकेतील ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले मंद्रूप झेडपी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव गुरुजींना सोमवार दि. पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
याप्रकरणी ठेवीदार योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जाधव गुरुजी व त्याच्या मुलास अटक केली आहे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता आधी दोन दिवस व नंतर तीन दिवस पोलीस ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. जाधव गुरुजींना अटक केल्यानंतर फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी तक्रार देण्यासाठी सदर बझार पोलिसांकडे रांग लावली असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये मंद्रूप व वडकबाळ परिसरातील ठेवीदार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. यात सरकारी कर्मचारी व अधिकारी असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. यातील सर्वात आधी गोरगरीब ठेवीदारांचे पैसे मिळावेत, म्हणून मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मंद्रूप पोलिसांनी काय केले?
गेल्या तीन महिन्यापासून जाधव गुरुजीच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. मंद्रूप पोलिसांनी संत सेवालाल निधी बँकेविरुध्दच्या 55 तक्रारी अर्जात केलेल्या चौकशीचा लवकरच पंचनामा करणार असल्याचे योगेश पवार यांनी म्हटले आहे.