सोलापूर : विधानसभा डोळ्यावर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेले प्रशासक भाजपच्या मुळावर असल्याचे दिसून येत आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी डीपीसी याबाबत लक्षवेधी केल्यानंतर पुन्हा रविवारी देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशासकराच्या कारभाराबाबत लक्ष वेधले आहे.

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यावर गेल्या दोन वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदेवर प्रशासकरात सुरू आहे. पण प्रशासकाने विकास कामाकडे लक्ष न देता आपला कारभार पुढे दामटल्यामुळे भाजपचे आमदार व पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. आमदारांच्या शिफारशीला केराची टोपली प्रशासकारांकडून दाखवली जात आहे. आमदारांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्या जात नसल्यामुळे असंतोष वाटला आहे. प्रशासक ठराविक आमदारांचे ऐकत असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला धोका निर्माण झाला आहे. याचाच परिपाक म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन च्या सभेत यावर लक्षवेधी केली. सत्ताधारी आमदारानेच याला  वाचा फोडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अशात रविवारी देवेंद्र फडणवीस सोलापूर विमानतळावर आले होते. त्यावेळी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी त्यांची भेट घेत महापालिकेच्या कारभाराबाबत तक्रार केली.  सोलापूर महानगरपालिकेच्या कामकाजात सुधारणा होण्याकरिता आपणाकडून आदेश द्यावेत अशी त्यांनी विनंती केली आहे. सोलापूर महानगरपालिकेत मागील अडीच वर्षापासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. अलीकडच्या काळात कामकाजातील ढिसाळपणा वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपल्या पक्षाविषयी देखील नाराजीचे सूर उमटत आहेत. तरी खाली कधी नमूद विषयांच्या बाबतीत गांभीर्याने दखल घेत महापालिकेचा कारभार सुधारणेकामी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत असे निवेदनात नमूद केले आहे. उजनी धरण जवळपास 80 टक्के भरलेले आहे. अशा परिस्थितीत देखील शहरातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसाआड सुरू आहे. तो  दोन ते तीन दिवसाआड करावा. कचरा संकलनाबाबतीत अलीकडच्या काळात तक्रारी वाढलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटीतून पूर्ण झालेली कामे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर बंद अवस्थेत आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा विषय देखील गंभीर बनत चालला आहे. त्यादृष्टीने लक्ष देऊन तरतूद करणे आवश्यक आहे. बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती लवकर केली जात नाही. संबंधित मक्तेदारांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे वारंवार जाणवते. पावसाळ्यात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळते. हद्दवाढ भागात तर सर्वत्र चिखलमय रस्ते पाहायला मिळत आहे. रस्ते स्वच्छ करण्याकरिता मोठ्या रकमेचा मक्ता मंजूर झालेला असून शहरातील धुळीचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने हे काम चोखपणे केले जाणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक रस्त्यांच्या दुभाजका शेजारी मोठ्या प्रमाणात माती साचल्याचे पाहायला मिळते. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण अपेक्षित आहे.

जिल्हा परिषदेच्या कामकाजाविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आले आहेत. कामकाजात सुसूत्रपणा नसल्यामुळे माझी सदस्यांचे कोणी ऐकेनासे  झाले आहे. सरपंचांचे विकासाचे कामाचे प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत. यामुळे बऱ्याच गावचे सरपंच भाजपवर नाराज असून आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसू शकतो अशा तक्रारी वाढल्या आहेत. एकूणच प्रशासकराज भाजपच्या मुळावर असल्याचे दिसून येत असल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झालेल्या आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांनी नमूद केल्याप्रमाणे सोलापूर शहराच्या विकासाची जाण असलेल्या अधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गरज भासत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *