सोलापूर : मला गोळ्या घातल्या तरी हसत मरण पत्करेन पण मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार आहे. यासाठी जरा दम धरा, विधानसभेला आपण लढायचे की, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडायचे याचा फैसला 29 ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथे करू अशी घोषणा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे यांनी लाखो मराठा बांधवांसमोर सोलापुरात बोलताना केली.
मनोज जरांगे- पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात बुधवारी सोलापुरातून केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी ,सकाळपासूनच मराठा समाजबांधव सोलापूरकडे येत होते. “एक मराठा लाख मराठा’ या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी घालून आबालवृद्ध या शांतता रॅलीत सहभागी झाले होते. दुपारी जरांगे- पाटील यांचे सोलापुर शहरात आगमन झाले. ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जरांगे यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज, पार्क चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून श्री सिद्धेश्वर मंदिरात जावून दर्शन घेतले.
त्यानंतर जरांगे- पाटील संभाजी महाराज चौकातून रॅलीने शिवाजी महाराज चौकात दाखल झाले.यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. बरोबर दुपारी 4 वाजता मनोज जरांगे यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी त्यांचा भव्य हार घालून सन्मान करण्यात आला . त्यानंतर त्यांनी तब्बल एक तास भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत नारायण राणे,प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राज ठाकरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.,मी मॅनेज होत नाही म्हणून मला बदनाम केले जात असून विरोधात टोळ्या उभ्या केल्या जात आहेत. समाजाच्या नेत्यांनी पक्ष आणि नेता बाजूला ठेऊन फक्त मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे असं आवाहन त्यांनी केले.
मराठा आरक्षणाला उघडपणे विरोध करणारे छगन भुजबळ यांना व फडणवीस ज्या मतदारसंघात जातील तिथला उमेदवार पाडा असं आवाहन करत त्यांनी माढा येथील अरण मध्ये झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे एकत्र बसून निवडणूक लढवायची का अन्य उमेदवार पाडायचे हा निर्णय घेणार असून मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केले.
मराठा समाजातील लोकांनी पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. समाजाला बाप मानून काम करा असं सांगत सर्वच पक्षाला या निवडणुकीत धडा शिकवणार असून एकच उमेदवार मराठा समाजाचा देऊ. आपसात वाद असले तरी समजाने दिलेला उमेदवार 100 टक्के मतदान करून निवडून आणा असेही मनोज जरांगे म्हणाले
भाजप ने एका मराठा क्रांती मोर्चाचे 3 करून आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न केले, मराठा आणि कुणबी एकच असताना समाज मागास असल्याचे सिद्ध झाले असतानाही आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आता ही लढाई निर्णायक लढा असून जोपर्यंत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मला गोळ्या जरी घातल्या तरी माघार घेणार नाही अशी गर्जना जरांगे यांनी केली. यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव शांतता रॅलीत सहभागी झाले होते.,या रॅलीच्या यशस्वीतेसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रुग्णवाहिकेला दिली वाट…
छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांचे आगमन झाल्यानंतर गर्दीतून एक रुग्णवाहिका आली. तेव्हा रस्त्यावर बसलेल्या महिलांनी तात्काळ बाजूला होत या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली.
समाज बांधवांना भोजनाची सोय
शहर व जिल्हाभरातून शांतता रॅलीसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांना फुड पाकिटे व जेवणाची सुविधा आमदार बबनराव शिंदे यांनी केली होती. एक लाख समाज बांधवांना पुरेल इतका मसाला भात, गोड शिरा देण्यात आला. यासाठी पहाटे चारपासून यंत्रणा कार्यरत होती. मराठा क्रांती मोर्चा आयोजकाच्यावतीने उपस्थिताना जागेवरच पाणी बाटली, फुड पाकिटे देण्यात आली. शिस्तबद्ध व शांततेत रॅली व सभा झाली. पोलिसांनीही वाहतूक व बंदोबस्ताचे नेटके नियोजन केले. जरांगे यांचे छत्रपती संभाजी चौकात आगमन झाल्यानंतर त्यांची छबी टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल उंचावले होते.